“मी कधीच विचार केला नव्हता… “ अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपचा उत्साह पाहून विराट खूश

0
29

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने शुक्रवारी सांगितले की, अमेरिकेत क्रिकेट खेळण्याचा मी कधीच विचार केला नव्हता आणि तिथं टी-20 विश्वचषक आयोजित केल्याने जगात खेळाचा वाढता प्रभाव दिसून येतो. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 जूनपासून टी-20 विश्वचषकाचे आयोजन होत आहे. कोहली शुक्रवारी संध्याकाळी (भारतीय वेळेनुसार) न्यूयॉर्कला पोहोचला आणि आता तो स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहे.

‘खरे सांगायचे तर, अमेरिकेत आम्ही कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळू असे मला कधीच वाटले नव्हते, पण आता ते प्रत्यक्षात येणार आहे,’ असे त्याने मुंबईतील यूएस कॉन्सुलेटने ‘एक्स’ वर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. कोहली म्हणाला की, आयसीसीला जगाच्या इतर भागात क्रिकेटचा प्रसार आणि विस्तार करायचा आहे आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषक आयोजित केल्याने त्याचे दूरगामी परिणाम होतील.

भारताची मोहीम 5 जूनपासून सुरू होणार

टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अ गटात समाविष्ट आहे ज्यामध्ये आयर्लंड, अमेरिका, पाकिस्तान आणि कॅनडाचे संघ आहेत. भारत 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध या जागतिक स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर 9 जूनला संघाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

किंग कोहली सध्या फॉर्मात आहे आणि आगामी विश्वचषकात भारतासाठी उपयुक्त ठरू शकतो. नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2024 मध्ये विराटने दमदार कामगिरी केली होती आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) साठी 15 सामन्यांमध्ये 154.69 च्या स्ट्राइक रेटने 741 धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून एक शतक आणि पाच अर्धशतके झाली. या मोसमात कोहली पुन्हा एकदा ऑरेंज कॅप जिंकणारा फलंदाज होता. यापूर्वी 2016 मध्ये त्याने 973 धावा करत ऑरेंज कॅप जिंकली होती.