संजय राऊतांची भाजपवर बोचरी टीका

0
47

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई– “भाजप हा भंगार गोळा करून मोठा झालेला पक्ष आहे. उद्या मुस्लिमांची मते हवी असतील, तर दाऊदलाही पक्षात घेतील,” अशा बोचऱ्या शब्दांत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताशी संबंध असल्याचा आरोप झेलणारे सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर हा वाद चिघळला आहे.

 

मंगळवारी ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध डावलून बडगुजर यांचा पक्षप्रवेश पार पडल्याचे बोलले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी भाजपवर देशद्रोही आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना पक्षात घेण्याचा गंभीर आरोप केला.

 

“भाजपने आता सलीम कुत्तालाही प्रचारासाठी आणायचं ठरवलंय काय? त्यांना देशद्रोही, गुंड, दहशतवाद्यांचे हस्तक आवडतात. सुधाकर बडगुजर आमच्याकडे असताना त्यांच्यावर आरोप लावले गेले. त्यांचं नाव सलीम कुत्ताशी जोडून आमचा पक्ष बदनाम केला गेला. पण आज त्यांनाच पक्षात घेतलं जातंय. म्हणजे भाजपनेच देशद्रोह्यांना आश्रय दिला,” असा घणाघात राऊत यांनी केला.

 

‘भाजपला स्वतःचं काही नाही’
“भाजपमध्ये आज ९० टक्के आमदार हे दुसऱ्या पक्षांतून आलेले आहेत. पोलिस यंत्रणा, सीबीआय, ईडी यांचा वापर करून आमचेच लोक फोडले जात आहेत. यांच्याकडे स्वतःचा नेता नाही, विचार नाही, आणि चारित्र्य तर नाहीच नाही,” अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

 

मोदींच्या भाषणांची आठवण
“प्रफुल्ल पटेल यांचे दाऊदशी संबंध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच एका सभेत सांगितले होते. त्यानंतर सलीम कुत्ता प्रकरण गाजवले गेले. देवेंद्र फडणवीसांनी स्वतः यावर एसआयटी नेमली होती. आज त्याच व्यक्तीचा भाजपमध्ये प्रवेश होत आहे, यावरून भाजपची दुटप्पी भूमिका उघड होते,” असेही राऊत म्हणाले.

 

पार्टी व्हायरल, चौकशी आणि नंतर पक्षप्रवेश
सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्तासोबतच्या पार्टीतील डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्या नितेश राणे, दादा भुसे यांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली होती. गृहमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत विशेष चौकशी पथकाकडून तपासाची घोषणाही केली होती. मात्र या प्रकरणावर फारसा पुढील अंमल न होता, बडगुजर यांनी वर्षभरानंतर थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here