
माणदेश एक्सप्रेस न्यूज|देहूगाव– “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात देहूनगरी भक्तिरसात न्हाली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार असून, त्यासाठी देहू शहर सज्ज झाले आहे. हजारो वारकरी, भाविक, दिंड्या आणि सेवेकरी देहूत दाखल झाले असून, श्रद्धा, भक्ती आणि शिस्तीचा अनुपम संगम पाहायला मिळत आहे.
यंदाच्या वारीत भाविकांच्या सुरक्षिततेसह सर्व सुविधांची व्यापक तयारी प्रशासन आणि मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. मंदिर परिसर, घाट, मुख्य रस्ते आणि मुक्काम स्थळी स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणासाठी अनेक पथकं तैनात करण्यात आली आहेत.
पालिकेचा सज्ज आराखडा
देहू नगरपंचायतीच्या वतीने १२०० हून अधिक तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. रस्ते, पदपथ आणि घाट परिसरात सफाई मोहीम राबवण्यात आली आहे. महावितरणने दिवसभर अखंड वीजपुरवठा सुनिश्चित केला असून, पदपथांवर फ्लडलाइट्स आणि टॉवर लाइट्स बसवण्यात आले आहेत.
पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज
वारीदरम्यान कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तीन सहायक पोलिस आयुक्त, १५ पोलिस निरीक्षक, ४३५ पोलिस अंमलदार आणि १३४ होमगार्ड्स अशी फौजफाटा तैनात करण्यात आली आहे. मुख्य मार्गांवर व घाट परिसरात ४२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. इंद्रायणी नदीच्या घाटावर NDRF च्या तुकड्या आणि जलजीवनरक्षक तैनात आहेत.
अन्नदान आणि वैद्यकीय सुविधा
श्री संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळासह अनेक अन्नछत्रांमार्फत हजारो वारकऱ्यांना मोफत भोजनाची सोय करण्यात आली आहे. गाथा मंदिर, मुख्य मंदिर आणि वैकुंठगमन मंदिर परिसरात वैद्यकीय केंद्रे सुरु असून, १०८ आपत्कालीन सेवा, कार्डियाक अॅनम्बुलन्स आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
पालखीची जय्यत तयारी
पालखी सोहळ्यासाठी पालखी रथाची ग्रिसिंग, ब्रेक सिस्टीम तपासणी, नवीन कपडे, गोंडे व गाद्यांची सजावट करण्यात आली आहे. जनरेटर व विद्युत व्यवस्था नव्याने उभारण्यात आली असून, सर्व दिंड्यांना शिस्तबद्धपणे मार्गक्रमण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पालखीचे मानाचे भोई तानाजी कळमकर व कांबळे तसेच सेवेकरी, म्हसलेकर, चोपदार आणि संस्थानचे विश्वस्त उपस्थित झाले आहेत. मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला असून, ‘ज्ञानदेव-तुकाराम’चा गजर आणि अभंगवाणीमुळे संपूर्ण देहू भक्तिमय वातावरणात रंगली आहे.