माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथे ओढापत्रातील 150 फूट जागा दे असे म्हणून माय-लेकराला कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली असून आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी गुलाब श्रीमंत घेरडे (वय 45), रा. गळवेवाडी ता. आटपाडी हे त्यांची आई बयाबाई श्रीमंत घेरडे यांच्यासोबत दिनांक ३०/०५/२०२४ रोजी दुपारी 3.०० च्या सुमारास त्यांच्या शेती गट नंबर तीन मध्ये डाळिंबाच्या बागेत फुटवे काढत होते. यावेळी त्यांचा सावत्र भाऊ पांडुरंग श्रीमंत घेरडे हा त्याठिकाणी आला.
यावेळी आरोपी पांडुरंग श्रीमंत घेरेडे याने फिर्यादीस मला ओढापत्रातील 150 फूट जागा दे असे म्हणून फिर्यादी व फिर्यादीच्या आईशी वाद घालू लागला. फिर्यादीने मी तुला जागा देऊ शकत नाही असे बोलल्याने मी तुला बघून घेतो असे म्हणून आरोपी कुऱ्हाड घेवून आला व फिर्यादीच्या तोंडावर मारली. फिर्यादीचा एक दात पडला आहे. त्यानंतर त्याच कुऱ्हाडीने फिर्यादीच्या आईच्या डाव्या हातावर मारत तिला जखमी केले आहे.
याप्रकरणी फिर्यादी गुलाब श्रीमंत घेरडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पांडुरंग श्रीमंत घेरडे यांच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.