
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | पुणे : “भारत-पाकिस्तान संघर्षाच्या काळात पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्याची ऐतिहासिक संधी होती, ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युद्धबंदी करून गमावली का?” असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, “भारतावर सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे. तरीही मोदी सरकारने पाकिस्तानविरुद्ध निर्णायक कारवाई का केली नाही, हे समजत नाही. जर संघर्षात आपण वर्चस्व राखले असेल, तर आपले हवाई दल नुकसानग्रस्त कसे झाले?”
यावेळी त्यांनी सिंगापूरमधील ‘शांग्री-ला डायलॉग’मधील भारताचे संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला. जनरल चौहान यांनी भारत-पाक संघर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय हवाई दलाच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची कबुली दिली होती. यावर आंबेडकरांनी सवाल केला की, “जर पाकिस्तानचे हल्ले निष्फळ होते, तर आपले नुकसान कसे आणि कुणामुळे झाले? हे बाह्य हल्ल्यामुळे की अंतर्गत त्रुटींमुळे?”
ते पुढे म्हणाले, “जर डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असेल, तर त्यांनी पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला होणार नाही याबाबत आश्वासन का मिळवले नाही? सरकारने जनतेसमोर सत्य मांडणे आवश्यक आहे.” ‘ऑपरेशन सिंदूर’ प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी भाजपवरही टीकास्त्र सोडलं. “तिरंगा विजय फेरी काढत भाजपने श्रेय घेतले, पण प्रत्यक्षात काय घडलं याची पारदर्शक माहिती सरकारने दिलेली नाही,” असा आरोपही त्यांनी केला. देशाच्या सुरक्षेसारख्या गंभीर मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगणे, ही दिशाभूल असल्याचे म्हणत आंबेडकरांनी सरकारकडून खुल्या स्पष्टीकरणाची मागणी केली.