
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : नागरिकांना त्यांच्या हक्काची लोकसेवा वेळेत व पारदर्शक पद्धतीने मिळावी या उद्देशाने आटपाडी नगरपंचायतीने एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने लागू केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ नुसार, नगरपंचायतीमार्फत देण्यात येणाऱ्या विविध लोकसेवांची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे.
नगरपंचायतीने अधिसूचना क्रमांक आ.न.पं./६८/२०२५ अन्वये खालील बाबींचा समावेश असलेली यादी तयार केली आहे. नगरपंचायतीमार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवांची सूची, प्रत्येक सेवेकरिता आवश्यक कागदपत्रांची यादी, संबंधित सेवेसाठी लागणारी फी (शुल्क), नियत कालमर्यादा – म्हणजेच सेवा मिळविण्यासाठी लागणारा अधिकतम वेळ, सेवा देणारे पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी आणि द्वितीय अपिलीय अधिकारी यांची माहिती.
ही माहिती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या कलम ३ नुसार अधिकृतरित्या अधिसूचित करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना कुठलीही सेवा घेण्यासाठी कोणाकडे, कधी, व कोणत्या कागदपत्रांसह जायचं याचे स्पष्ट मार्गदर्शन मिळेल. तसेच, जर सेवा वेळेत मिळाली नाही किंवा अडथळे आले, तर अपील करण्याची प्रक्रिया देखील यात स्पष्ट करण्यात आली आहे.
नगरपंचायतीच्या या उपक्रमामुळे शासनाच्या सेवा सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, लोकसेवांचा गैरवापर, अकार्यक्षमता आणि अपारदर्शकतेला आळा बसणार असल्याने हाच खरा “सक्षम आणि जबाबदार प्रशासनाचा” प्रत्यय येईल, असे अनेक नागरिकांनी सांगितले. अधिक माहितीसाठी नागरिकांनी आटपाडी नगरपंचायतीच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.