‘या’ राज्यात अतिवृष्टीमुळे 15 जणांचा मृत्यू तर 11 हजार लोकांचं स्थलांतर, 27 जिल्ह्यांना रेड अलर्ट

0
320

गुजरातमध्ये सध्या अतिवृष्टी होत आहे. मागच्या 48 तासात मुसळधार पाऊस गुजरातमध्ये झाला आहे. या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. ठिकठिकाणी पाणी साचलं. रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. तर काहींच्या घरात पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कोसळत असलेल्या तुफान पावसामुळे हवामान खात्याकडून 27 जिल्ह्याना रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या हवामान विभागाने 27 जिल्ह्याना रेड अलर्ट देण्यात दिला आहे.

गुजरातमध्ये अतिमुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे तलाव ओव्हरफ्लो झालेत. नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. अशात सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. जामनगर ते जुनागड, वडोदरा ते बनासकांठापर्यंत आणि अरावली ते अहमदाबादपर्यंत तुफान पाऊस झाला. हा सगळा परिसर जलमय झाला आहे. उच्चभ्रू वस्तीतील घरं देखील पाण्याखाली गेली आहेत.

गुजरातच्या वडोदरामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिक त्रस्त आहेत. सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसत आहे. ज्या रस्त्यांवरून गाड्या धावायच्या त्या रस्त्यावर आज कित्येक फूट पाणी आहे. रस्त्यांवरच्या साचलेल्या पाण्यामुळे शहराच्या वेगाला ब्रेक लागला आहे. गुजरातमधील या तुफान पावसामुळे नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. 15 जणांचा मृत्यू या पावसामुळे झालाय. तर 11 हजारांच्या पेक्षा जास्त लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. ज्या भागात लोक अडकले आहेत. त्या ठिकाणी रेक्स्यू ऑपरेशन सुरु आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

वडोदरामधल्या आजवा सरोवरातून विश्वामित्र नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे विश्वामित्र नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. धोका पातळीच्यावर 8 फुटांवरून ही नदी वाहते आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाकडून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागातल्या चार हजारहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. अशातच हवामान विभागाने आज आणि उद्यासाठी 27 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.