धक्कादायक! सांगली जिल्ह्यात ५ अल्पवयीन मुलांकडून तरुणाच्या डोक्यात कोयत्यानं वार करुन त्याची निघृण हत्या

0
586

सांगली शहरातील जामवाडी मधील मरगुबाई मंदिराजवळ पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून एका तरूणाचा निघृणपणे संपवण्यात आलं आहे. तरुणाच्या डोक्यात कोयत्यानं वार करुन त्याची निघृण हत्या करण्यात आली. हनुमान जयंतीला झालेल्या वादातून पाचजणांनी हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे.

सांगलीतील  जामवाडी येथे राहणारा 22 वर्षीय अनिकेत तुकाराम हिप्परकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. अनिकेत एका आर्थिक संस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करत होता. जामवाडीतील एका सार्वजनिक मंडळातही तो सक्रीय होता. तसेच, तो कब्बडीपटू देखील होता.

काही महिन्यांपूर्वी हनुमान जयंतीवेळी त्याचा मंडळातील काही मुलांशी वाद झाला होता. त्यातून त्यानं एकाला कानाखाली मारली होती. त्याचा राग मुलांनी मनात ठेवला होता. जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळ अनिकेत थांबला होता. त्यावेळी संशयित अल्पवयीन मुलं तिथे आली. त्यांनी पूर्वी झालेल्या वादाचा जाब त्याला विचारला. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वाद एवढा वाढला की, अगदी विकोपाला गेला. त्यानंतर संशयित दोन मुलांनी अनिकेतवर दोन कोयत्यांनी सपासप वार केले.

नेमकं घडलं काय?
कोयत्याचे वार वर्मी बसल्यानं अनिकेत तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर संशयित मुलांनी अनिकेतला तिथेच सोडून पळ काढला. या खुनी हल्ल्याची माहिती मिळताच उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच, तात्काळ संशयितांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली.

आरोपीचा श्वानपथकाद्वारे माग काढण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर हल्लेखोर कर्नाळ रस्त्याकडे पळाल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला. काही वेळातच पाचही संशयित पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सध्या पोलीस सखोल शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here