
पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या महाकाय लघुग्रहानं वैज्ञानिकांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर टाकली आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) ने त्यांच्या नव्या अभ्यासात समोर आणलेल्या एका गोष्टीने सगळेच हैराण आहेत. २०२४ YR4 नावाचा हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता अधिक असल्याचं म्हटलं आहे.
नासाने २०२४ – YR4 या लघुग्रहाचा पृथ्वीशी टक्कर होण्याचा धोका ३.१ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. नासाने यापूर्वी पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता २.३ टक्के असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे या परिस्थितीत लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता चिंतेचा विषय बनला आहे. या लघुग्रहाचा सर्वाधिक धोका असलेल्या शहरांमध्ये भारतातील मुंबई आणि कोलकाता यांचा समावेश आहे.
हा लघुग्रह २०३२ मध्ये पृथ्वीजवळून जाईल. या कालावधीत पृथ्वीला धडकण्याची शक्यता ३.१ टक्के आहे. यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी नासाने या लघुग्रहाची पृथ्वीवर आदळण्याची शक्यता १.२ वरून २.३ टक्क्यांपर्यंत वाढवली होती. यानंतर, हा धोका २.६ पर्यंत वाढवण्यात आला आणि आता ही शक्यता ३.१ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या लघुग्रहाची चंद्राशी टक्कर होण्याची शक्यताही ०.३ टक्के आहे.
लघुग्रह २०२४ YR4 पृथ्वीच्या कोणत्या भागाला धडकणार हे पूर्णत: स्पष्ट नाही. जर याची टक्कर पृथ्वीशी झाली तर ती पूर्व प्रशांत महासागर, उत्तर दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, आफ्रिका, अरबी समुद्र आणि दक्षिण आशियात कुठेही होण्याची शक्यता आहे. हे संकट पाहता या संपूर्ण क्षेत्राला जोखीचा भाग मानलं जात आहे.
या लघुग्रहाचा ज्या शहरांना सर्वाधिक धोका आहे त्यात भारतातील मुंबई आणि पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि बांगलादेशातील ढाका शहराला आहे. कोलंबियाची राजधानी बोगोटा शहरालाही धोका असल्याचा अंदाज आहे. पश्चिम आफ्रिकेतील मोठं शहर अबिदजान, नायजेरियातील लागोस आणि सूडानची राजधानी खार्तूम यांचाही समावेश आहे.
लघुग्रह २०२४ YR4 जवळपास १७७ फूट आकाराचा आहे. जे पिसाच्या झुकत्या मनोऱ्याइतका उंच आहे. हा पृथ्वीवर आदळल्यानंतर एक मोठं शहर उद्ध्वस्त होऊन मलब्याच्या ढिगाऱ्यात बदलू शकते. जर ते पृथ्वीला धडकले तर जवळपास ८ मेगाटन ऊर्जा सोडेल. ही ऊर्जा हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बच्या ५०० पट अधिक असेल.
तज्ज्ञांच्या मते, आताही ९६.९ टक्के हा लघुग्रह पृथ्वीला धडकणार नसल्याची शक्यता आहे परंतु ३.१ टक्के धोका दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही. जसं जसं या लघुग्रहाच्या मार्गाबद्दल अधिक माहिती उपलब्ध होईल तसं टक्कर होण्याची शक्यता कमी होईल किंवा ही शक्यता शून्यापर्यंतही जाऊ शकते अशी अपेक्षा संशोधकांनी ठेवली आहे.
नासाचे वैज्ञानिक या लघुग्रहाबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना या लघुग्रहाच्या मार्गाचा अचूक अंदाज घेता येईल. वैज्ञानिकांच्या एक टीमला YR4 चा आढावा घेण्यासाठी जेम्स वेब स्पेस टेलिस्कॉपचा वापर करण्याची परवानगी मिळाली आहे. लवकरच याबाबत आणखी माहिती समोर येऊ शकते.
जर हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत आला तर त्याचा हवेतच स्फोट होऊ शकतो आणि त्यातून ८ मेगाटन ऊर्जा बाहेर येऊ शकते. ६.६ कोटी वर्षापूर्वी डायनासोरला ज्या लघुग्रहाने पृथ्वीवरून संपवलं होते तो ९.६ किमी रूंद होता. त्याच्या तुलनेत २०२४ YR4 हा सिटी किलर म्हटला जाऊ शकतो म्हणजे यामुळे जागतिक विध्वंस होणार नाही परंतु मोठी हानी करण्याची क्षमता त्यात आहे.
सध्या हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची जोखीम ३.१ टक्के आहे जर ती १० टक्क्याहून अधिक गेली तर आंतरराष्ट्रीय लघुग्रह इशारा नेटवर्क (IAWN) सतर्कतेचा इशारा जारी करेल. ज्यातून संभाव्य धोकादायक परिसरात पूर्व तयारी करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सर्व सदस्यांना शिफारस करण्यात येईल. या लघुग्रहाचा धोका भारतालाही आहे असं डेली मेल रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.