
माणदेश एक्सप्रेस न्यूज : रीलस्टार व ‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक‘ हा पहिला चित्रपट १० दिवसांपूर्वी (२५ एप्रिल २०२५) प्रदर्शित झाला. सूरजला ‘बिग बॉस मराठी’त जेवढं प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, तेवढं त्याच्या पदार्पणाच्या चित्रपटाला मिळालं नाही. ‘झापुक झुपूक’ने १० दिवसांत किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.
‘झापुक झुपूक‘ने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती, तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकला नाही. सुरुवातीचे तीन दिवस चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती, नंतर मात्र प्रेक्षकांनी ‘झापुक झुपूक’कडे पाठ फिरवली. चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांवरून हे स्पष्ट होत आहे.
‘झापुक झुपूक’चे १० दिवसांचे कलेक्शन
सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने शुक्रवारी म्हणजेच पहिल्या दिवशी २४ लाख आणि दुसऱ्या दिवशीही २४ लाख कमावले. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने १९ लाख, चौथ्या दिवशी १४ लाखांचा गल्ला जमवला. ‘झापुक झुपूक’ने पाचव्या दिवशी १७ लाख रुपयांचे कलेक्शन केले. सहाव्या दिवसापासून कलेक्शनमध्ये मोठी घट झाली. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, ‘झापुक झुपूक’ने सहाव्या दिवशी ९ लाख रुपये कमावले आणि सातव्या दिवशी ५ लाख रुपयांची कमाई केली.
‘झापुक झुपूक’ने आठव्या दिवशी १ लाख, नवव्या दिवशीही १ लाख आणि १० व्या दिवशीही १ लाख रुपये कमावले आहेत. ‘झापुक झुपूक’चे वर्ल्ड वाइड कलेक्शन १.२७ कोटी रुपये झाले आहे.
मागील तीन दिवसांची कमाई पाहता या दुसऱ्या आठवड्यात ‘झापुक झुपूक’ च्या कलेक्शनममध्ये वाढ होण्याची शक्यता नाही. केदार शिंदेंनी ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेमध्ये सूरज चव्हाणला घेऊन ‘झापुक झुपूक’ नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, याबद्दल केदार शिंदे यांनी खंत व्यक्त केली होती.
काय म्हणाले केदार शिंदे?
“काही लोक ठरवून सूरजबद्दल ही मतं मांडत आहेत. ती म्हणजे, हा माकडतोंड्या आहे, कसला दिसतो, याला काय येतं? बोबडा बोलतो अशा कमेंट्स लोक करत आहेत. पण, हे असं बोलणारे लोक सूरजने आतापर्यंत केलेली प्रगती पाहत नाहीयेत. त्याचा गावापासून सुरू झालेला प्रवास हा दृष्ट लागण्यासारखा आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकांना आताच आळा घातला पाहिजे. सूरजने या सगळ्या गोष्टींसाठी मला काही पैसे दिलेले नाहीयेत. तो स्वत: मेहनत घेऊन पुढे आला आहे. सूरज आजपर्यंत कसा होता यापेक्षा त्याने सिनेमात कसं काम केलंय हे पाहणं गरजेचं आहे. या ट्रोलर्सना वेळीच थांबवलं नाही तर, महाराष्ट्रातील गावाखेड्यातला मुलगा कधीच पुढे जाणार नाही,” असं केदार शिंदे म्हणाले होते.