एकदा वेगवेगळे लढून स्वतःची ताकद बघितलीच पाहिजे…

0
313

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : गेल्या सोमवारी याच सदरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपाने स्वबळावर लढण्याचे जवळपास निश्चित केल्याचे लिहिले होते. त्याचा परिणाम ठाकरे शिवसेनेवर इतक्या तडकाफडकी होईल, असे वाटले नाही. नागपूरपासून मुंबईपर्यंतच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वबळावर लढवणार आहोत, असे म्हणत संजय राऊत यांनी एकदाचे होऊनच जाऊ द्या, असेही सांगून टाकले. त्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी अशा बातम्या सुरू झाल्या. मात्र, ही बिघाडी नसून ठरवून घेतला जाणारा काडीमोड असेल. महायुती सत्तेत असली तरी भाजपला मुंबई, ठाण्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची आहे.

 

गटप्रमुखांचे नेटवर्क किती सक्षमपणे अजूनही आपल्या सोबत आहे, याची तपासणी करण्यासाठीच ठाकरे सेनेने मध्यंतरी वेगवेगळे निरीक्षक मुंबईच्या वेगवेगळ्या भागात पाठवले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबई फारसे अस्तित्व नाही. काँग्रेसमध्ये निर्णय घेणारा नेता नाही. असणाऱ्या नेत्यांचे ऐकून काम करणारी यंत्रणा काँग्रेसकडे उरलेली नाही. असे अहवाल पक्षनिरीक्षकांनी ठाकरेंना दिले. ते देत असताना प्रत्येकाने किती गटप्रमुख आपल्या सोबत जोडलेले आहेत, याची आकडेवारी दिली. आजही बऱ्यापैकी गटप्रमुखांचे नेटवर्क आपल्या सोबत आहे, हे ठाकरेंच्या लक्षात आले. प्रत्येक निरीक्षकाने आपण स्वतंत्र लढले पाहिजे, असेही सांगितल्यामुळे ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यामार्फत स्वतंत्र लढण्याची भूमिका जाहीर केली आहे.

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष सत्तेत असताना असेच वागत आले. राज्यात सरकार या दोघांचे होते. मात्र, गावागावात दोघांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात लढायचे. त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते प्रोत्साहन द्यायचे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये हे दोन्हीही पक्ष आपला मतदार टिकवून ठेवू शकले होते. विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी तिघांनाही आपला मूळ जनाधार सुटू नये, याचीच काळजी घ्यावी लागणार आहे. तो सुटू द्यायचा नसेल तर कार्यकर्त्यांना महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत उमेदवाऱ्या द्याव्या लागतील.

 

शिंदे यांच्या शिवसेनेला याची जाणीव असल्यामुळे त्यांनी या निवडणुका युती म्हणून लढायला हव्यात, अशी भूमिका ठाण्यात घेतली आहे. ठाण्याचे शिंदे गटाचे खा. नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया “लेकी बोले, सुने लागे” या पद्धतीची आहे. “बहुमत असतानाही काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपद मिळणार म्हणून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे, आता स्वबळाचा नारा देत काँग्रेसवर टीका करत आहेत. ही रंग बदलणारी नवीन जात आहे. आता मुंबई महापालिकेसाठी ते अशीच भूमिका घेत आहेत”, या शब्दात म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(स्त्रोत-लोकमत)