हिंदी सिनेसृष्टीत उर्मिला मातोंडकरची(Urmila Matondkar) रंगीला गर्ल म्हणून ओळख आहे. राजकारणी, अभिनेत्री असलेल्या उर्मिला मातोंडकरने 4 फेब्रुवारी 2016 रोजी काश्मिरी व्यापारी व मॉडेल असलेल्या मोहसिन अख्तर मीर(Mohsin Akhtar Mir)यांच्यासोबत प्रेम विवाह केला होता. मात्र लग्नाच्या 8 वर्षातच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने पतीविरोधात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. उर्मिला मातोंडकरचा हा आंतरधर्मीय विवाह होता. त्याशिवाय, दोघांच्या वयामध्ये 10 वर्षांचा फरक आहे. हिंदुस्तान टाईम्सने त्यांच्या घटस्फोटाचे वृत्त दिले आहे.
‘ई टाइम्स’ने मुंबईतील एका न्यायालयातील सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, उर्मिला मातोंडकरने 4 महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. उर्मिला व मोहसीन परस्पर सहमतीने विभक्त होत नसल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे. त्यांच्या विभक्त होण्यामागील कारण अद्याप समोर आलेली नाहीत. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात उर्मिला आणि मोहसिन यांची पहिली भेट झाली होती. दोघांमध्ये आधी मैत्री नंतर प्रेम अशा गोष्टी घडल्या. 2016 मध्ये खासगी समारंभात त्यांनी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. त्यांच्या वयातील फरकामुळे यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. उर्मिला 50 वर्षांची आहे, तर मोहसीन 40 वर्षांचा आहे.
कोण आहे मोहसीन अख्तर मीर?
मोहसीन हा मूळचा काश्मिरचा आहे. तो व्यावसायिक आणि मॉडेल आहे. मोहसीनने २००९ मध्ये ‘इट्स अ मॅन्स वर्ल्ड’ चित्रपटातून पदार्पण केले, नंतर त्याने त्याच वर्षी ‘लक बाय चान्स’ मध्ये काम केलं. दोन वर्षांनी तो ‘मुंबई मस्त कलंदर’ मध्ये झळकला. त्याने ‘बी.ए. पास’ चित्रपटातही काम केलं होतं. आता तो मनीष मल्होत्राच्या ब्रँडबरोबर मिळून काम करतो, असं म्हटलं जातं.