
माणदेश एक्सप्रेस न्यूज
सांगली : शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना पक्षांतर्गत मतभेद आणि अपमानजनक परिस्थितीचा अनुभव घेत अस्वस्थ झालेल्या पृथ्वीराज पाटील यांनी अखेर भाजपचा झेंडा हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समर्थकांसह पक्षप्रवेश करणार आहेत.
दशकभर निष्ठेने काँग्रेससाठी काम करूनही योग्य सन्मान न मिळाल्याने पाटील यांची नाराजी वाढली होती. विधानसभा निवडणुकीदरम्यान घडलेल्या घटनांचा गहिरा ठसा त्यांच्या मनात राहिला आणि त्यामुळे त्यांनी नवीन राजकीय वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार क्षेत्रात त्यांचे असल्लेले भक्कम स्थान आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून त्यांचा अनुभव भाजपसाठी मोठा लाभ ठरणार आहे.
सांगलीच्या राजकारणात पाटील यांची ताकद भाजपच्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत महत्त्वाचा फटका देईल. आगामी काळात ते सांगली भाजपच्या नेतृत्वामध्ये अग्रस्थानी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाटील यांच्या निवासस्थानी भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांची मोठी उपस्थिती होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे व आमदार प्रविण दरेकर यांच्या भेटीनंतर पक्षप्रवेशाच्या सर्व तयारी पूर्ण झाल्या असून उद्याच्या कार्यक्रमाने राजकीय वातावरणात मोठे बदल होणार आहेत.