माणदेश एक्सप्रेस/मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ते नाराजी व्यक्त करून थांबले नाहीत तर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव घेत थेट टीका देखील केली होती. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय चाललंय? याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. दरम्यान, शुक्रवारी (२४ जानेवारी) केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातील मालेगावातील एका कार्यक्रमात अमित शाह आणि छगन भुजबळ हे व्यासपीठावर शेजारी बसलेले पाहायला मिळाले. शाह यांनी स्वतःहून भुजबळांना त्यांच्या शेजारची खुर्ची दिली. भुजबळ भाजपात जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान शाह यांनी केलेल्या या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.“मालेगावमधील कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा नव्हता, तो शासकीय कार्यक्रम होता. त्यामुळे तिथे सर्वच पक्षांचे लोक होते”, असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. तसेच, “त्या कार्यक्रमात अमित शाह यांनी छगन भुजबळ यांना खुर्ची दिली असेल तर त्यात गैर काहीच नाही”, असेही महाजन म्हणाले.
गिरीश महाजन म्हणाले, “मला वाटतं तो भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम नव्हता. तो एक शासकीय कार्यक्रम असल्यामुळे सर्वच मंत्र्यांना व आमदारांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे १४ मंत्र्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत, हे वरिष्ठ नेते अनेक वर्षे मंत्री देखील राहिले आहेत. सहाजिकच त्यांना खुर्ची देण्यात गैर काहीच नाही. तुम्ही वारंवार भुजबळांबाबत प्रश्न विचारत आहात, मात्र मी त्यावर काही बोलू शकत नाही. त्याबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील. भुजबळ आमच्या वरिष्ठांशी बोलतील. देवेंद्र फडणवीस किंवा इतर कुठल्यातरी नेत्याशी बोलतील”.