सांगलीचा खासदार कोण? आज ठरणार ! ; विशाल, मशाल की संजयकाका बाजी मारणार? ; थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

0
7

माणदेश एक्सप्रेस न्युज/ सांगली : सांगली लोकसभेसाठी यंदा जवळपास 61 टक्के मतदान झालं. त्यामध्ये खरी लढत ही अपक्ष विशाल पाटील आणि भाजपचे संजयकाका पाटील यांच्यात झाली. विविध एक्झिट पोलमध्येही विशाल पाटील हेच आघाडीवर असल्याचं सांगितलं गेलं. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रहार पाटलांना मदत न करता अपक्ष असलेल्या विशाल पाटलांना मदत केल्याचे उघड झालं. त्यामुळेच सांगलीतील बाजी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.

 

महाविकास आघाडीतील जागावाटपामध्ये सांगतीची जागा ही सर्वाधिक वादाची ठरली. शिवसेना ठाकरे गटाने परस्पर या जागेवर चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि त्यानंतर जो वाद सुरू झाला तो शेवटपर्यंत मिटला नाही. काँग्रेसने यावर नाराजी दर्शवली, अगदी दिल्लीवाऱ्याही केल्या. पण शिवसेना ठाकरे गटाने शेवटपर्यंत ही जागा सोडली नाही. शेवटी विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला.

 

काँग्रेसच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी विशाल पाटलांना मदत केली. खासकरून आमदार विश्वजीत कदम जरी महाविकास आघाडीच्या स्टेजवर दिसले तरी त्यांचा कल हा कुणाकडे होता हे उघड होतं. विश्वजीत कदमांची सर्व यंत्रणा ही विशाल पाटलांच्या मागे उभी राहिली आणि परिणामी विशाल पाटील यांचे पारडे जड झाले.

 

दुसरीकडे भाजपचे संजयकाका पाटलांना तिसऱ्यांना उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. सुरुवातीला संजयकाका सहज निवडून येतील अशी चर्चा असताना नंतर मात्र विशाल पाटलांनी त्यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण केल्याचं दिसून आलं.

 

विधानसभा क्षेत्रनिहाय प्राथमिक अंदाजे मतदान

मिरज-62.10 टक्के

सांगली-58.20 टक्के

पलूस-कडेगाव-60.05 टक्के

खानापूर-आटपाडी-58.93 टक्के

तासगाव-66.06 टक्के

जत-60.73 टक्के