रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी कधी उभारणार? शिवप्रेमींचा सरकारला प्रश्न…

0
136

अलिबाग : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टीची घोषणा राज्य शासनाने पाच वर्षांपूर्वी केली होती. मात्र, अद्याप या कामाची एक वीटही रचली गेली नाही. आता रायगड प्राधिकरणाकडून प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्याच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिवसृष्टी कधी उभी राहणार, असा प्रश्न शिवप्रेमी करीत आहेत.

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे ही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. यासाठी ८० एकर जागेचे संपादन पूर्ण झाले आहे. ५० कोटींचा प्राथमिक निधी राज्य सरकारने दिला होता. मात्र, हे काम अजूनही प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. ज्याचे सादरीकरण नुकत्याच पार पडलेल्या रायगड प्राधिकरणाच्या बैठकीत करण्यात आले. यानंतर शिवसृष्टीचा आराखडा अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

किल्ल्यांचा इतिहास जिवंत करून दाखविण्यासाठी शिवसृष्टी तयार करणे, रायगड किल्ल्यावर प्राचीन वास्तूंचे संवर्धन, शास्त्रयुक्त पद्धतीने डेब्रिज काढणे व उत्खननातील प्राचीन इमारतीचे संवर्धन करणे, गडावर विविध ठिकाणी आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, रायगड किल्ल्यावरील सर्व वस्तूंचे डॉक्युमेन्टेशन, हद्दीचे सीमांकन आदी कामांचा समावेश या आराखड्यात करण्यात आला आहे.

रायगड किल्ल्यावरील चीत्त दरवाजा, नाना दरवाजा, खुबलढा बुरुज, महादरवाजा आदींचे संवर्धन व जिर्णोद्धार करणे, तसेच पर्यटक व शिवप्रेमींना रायगडावर पोहचण्यासाठी मजबूत पायवाटा निर्माण करणे. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आदी महत्त्वाच्या सोयी उपलब्ध करून देणे, जलसंवर्धन या बाबींचा समावेश आहे. याशिवाय पाचड येथील राजमाता जिजाऊ समाधी व जिजामाता वाडा यांच्या संवर्धन व जिर्णोद्धाराचे कार्य तथा याठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिवसृष्टी उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठीचा आराखडा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.