विश्वजीत यांना आघाडीधर्म शिकवणाऱ्या संजयकाकांनी कधी युतीधर्माचे पालन केले? विशाल पाटील यांचा सवाल

0
2

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : खास. संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषद घेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला विशाल पाटील यांनी उत्तर दिले असून, खासदारांच्या दिलदार शत्रूनेच त्यांचा घात केला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, भाजपाचे खासदार संजय पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत अनेक षडयंत्रे आखली. ती फसल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, अशी भावना खासदार व्यक्त करीत असले तरी याच दिलदार शत्रूशी संगनमत करुन त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

लोकसभा निवडणुकीत षड्यंत्र रचले गेल्यानंतर खासदारांचा आत्मविश्वास वाढला होता. तीन ते चार लाख मतांनी विजयी होऊ, असा आत्मविश्वास त्यांना होता. सांगलीतील जनतेने षड्यंत्र ओळखले. तेव्हापासून खासदारांचा मूड खराब झाला. सांगलीत भाजप कमकुवत झाली आहे. उमेदवारही कमजोर दिला. अशावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अपेक्षा ठेवली. त्यांच्या दिलदार शत्रूप्रमाणे इतरांनी मदत करावी, अशी अपेक्षा बाळगली. ते झाले नाही. त्यातूनच ते काँग्रेस नेत्यांवर टीका करताहेत.

आमदार विश्वजीत कदम यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी काम केले. त्यांच्या पाठीशी दादाप्रेमी जनता उभी आहे. आमची एकी अभेद्य आहे. माझा दोस्त दिलदार आहे, ही दोस्ती आता तुटणार नाही. खासदार त्यांना धमक्या देत आहेत. पण, मी त्यांच्या पाठीशी आहे.
तसेच खासदारांकडे चांगले काही सांगण्यासारखे नव्हते. सर्व खेळ्या अपयशी ठरल्यानंतर हतबलतेपोटी त्यांनी माझे काही फोटो व्हायरल केले. फेक न्यूज फिरवल्या. त्याविरोधात आम्ही तक्रारही दाखल केली आहे, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.