मॅसेजिंगॲप व्हॉट्सॲप आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असते. जगभरात लाखो लोक व्हॉट्सॲपचे यूजर झाले आहेत. दैनंदिन जीवनात कार्यलयीन कामापासून, प्रियजनांशी संवाद साधण्यापर्यंत सर्वच कामांसाठी आपण व्हॉट्सॲपचा वापर करतो. व्हॉट्सॲपमुळे आपण कोणतीही माहिती सहजपणे मिळवू शकतो. मात्र जेव्हा इंटरनेट असेल तेव्हा हे शक्य होते. परंतू आता व्हॉट्सॲप त्यात बदल करत ॲप इंटरनेट शिवाय काम करण्यावर काम करत आहे. सध्या इंटरनेटशिवाय आपण व्हॉट्सॲपद्वारे कोणताही मेसेज ट्रान्सफर करु शकत नाही. परंतु नव्या फिचरमध्ये कोणतीही फाइल इंटरनेटशिवाय ट्रान्सफर करु शकणार आहोत. यासाठी व्हॉट्सॲप लवकरच एक फीचर लाँच करणार आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, मेटा कंपनी व्हॉट्सॲपच्या नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरमध्ये वापरकर्त्यांना कोणताही चित्रपट किंवा हेवी फाइल पाठवण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. हे फिचर आयफोन एअरड्रॉप फाइल शेअरिंग फिचरप्रमाणे काम करेल. व्हॉट्सॲप सध्या नवीन फाइल शेअरिंग फीचरची चाचणी करत आहे. हे फीचर यशस्वी ठरले तर इंटरनेटशिवाय वापरकर्ते फाइल पाठवू शकतात. व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरमुळे तुम्हाला फोटो, व्हिडिओ, फाइल शेअर करणे सोपे होणार आहे.
व्हॉट्सॲपच्या या फीचरमध्ये क्यूआर कोडचा वापर केला जाईल. ज्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करुन फाइल ट्रान्सफर करता येणार आहे. अनेकदा मोठ्या फाइल्स ट्रान्सफर करताना नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे इंटरनेटशिवाय फाइल ट्रान्सफर करणे सोपे होणार आहे किंवा अडथळ्यांशिवाय ते काम होऊ शकतो. व्हॉट्सॲपच्या या फीचरमध्ये एंड टू एंड एनक्रिप्शन असेल. ज्यामुळे युजर्सच्या गोपनियतेचे पाळन केले जाणार आहे.