सिलेंडरवरील सबसिडीबाबत काय निर्णय होणार, सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष

0
203

सरकार लकरच केंद्रीय बजेट सादर करेल. यामध्ये LPG सबसिडीविषयी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारी तेल कंपन्यांना (OMC) जवळपास 9,000 कोटी रुपयांची LPG सबसिडी देऊ शकते. उज्ज्वला योजनेतंर्गत ही आर्थिक मदत देण्यात येईल. यामुळे देशातील 10 कोटींहून अधिक उज्ज्वला ग्राहकांना मोठा फायदा होईल. सरकार प्रत्येक बजेटमध्ये तेल कंपन्यांना LPG सबसिडी देते. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त एलपीजी गॅस मिळतो. यावर्षी अंतरिम बजेटमध्ये पण सरकारने OMCs ला आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. ईटी नाऊने सूत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, आगामी बजेटमध्ये सरकार ही सबसिडी कायम ठेवणार आहे.

सरकारकडून 300 रुपयांची सबसिडी

पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत (PMUY) सरकार लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 300 रुपयांची सबसिडी देते. या योजनेला सरकारने अगोदरच मार्च 2025 पर्यंत वाढीव मुदत दिली आहे. 1 मार्च, 2024 पर्यंत 10.27 कोटींहून अधिक PMUY लाभार्थी असल्याची सरकार दप्तरी नोंद आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात (2024-25) मध्ये OMCs ला 2,000 कोटींचे अनुदान दिले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मोफत LPG कनेक्शनसाठी मोफत आर्थिक मदत आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. सरकारने या योजनेतंर्गत अगोदरच 70,000 हून अधिक नवीन जोडण्या करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय बजेट या महिन्याअखेर सादर होईल. त्यात याविषयीच्या तरतुदीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

PLI योजनेचा विस्तार

याशिवाय मोदी सरकार उत्पादनाबाबत प्रोत्साहन योजना PLI चा विस्तार होण्याची घोषणा करण्यात येऊ शकते. त्यामुळे अधिकाधिक प्रदेशाचा त्यात समावेश करण्यात येईल. त्यामाध्यमातून रोजगार निर्मिती होईल. या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकार काय पाऊल टाकते हे लवकरच समोर येईल.

मार्चनंतर किंमतीत नाही बदल

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत गेल्या तीन महिन्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. तर 1 जुलै रोजी 14.2 किलो वजनाच्या सिलेंडरचे भाव जैसे थे ठेवण्यात आले. 9 मार्च 2024 रोजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत अखेरचा बदल दिसला होता. त्यावेळी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी उतरली होती. तेव्हापासून दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर 803 रुपये आणि मुंबईत 802.50 रुपयांना मिळत आहे. कोलकात्यात 829 रुपये तर चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर मिळत आहे.