
माणदेश एक्सप्रेस न्यूज| पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात तब्बल आठ वर्षांनंतर नव्या बसगाड्या दाखल होत असून, यंदाच्या आषाढी वारीत या ‘नव्या लालपरी’ वारकऱ्यांच्या सेवेत धावणार आहेत. त्यामुळे पुण्यासह राज्यभरातील लाखो भाविकांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे.
२०१६ नंतर एसटी महामंडळाने कोणतीही नवीन बस खरेदी केली नव्हती. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून वारकऱ्यांना जुन्या बसमधून प्रवास करावा लागत होता. मात्र, यंदा राज्यातील सर्वच आगारांमध्ये नव्या लालपरी दाखल होत आहेत. पुणे विभागातही सुमारे ६५ नवीन बसगाड्या दाखल झाल्या असून, पुढील महिन्यात आणखी तितक्याच बस येणार असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले.
प्रत्येक वर्षी आषाढी वारीच्या काळात पुण्यासह राज्यातील विविध आगारांमधून पंढरपूरकडे विशेष बस सोडण्यात येतात. गेल्या वर्षी पुणे विभागातून तब्बल ३८० एसटी बस वारीसाठी सोडण्यात आल्या होत्या. यंदा नवीन बसमुळे या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
एसटीच्या नव्या बसगाड्यांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक आरामदायी आसनव्यवस्था, चांगले सस्पेन्शन, सुरक्षित ब्रेकिंग सिस्टीम यांसारख्या सुविधा असतील. त्यामुळे दीर्घ प्रवास करताना वारकऱ्यांना अधिक आरामदायक अनुभव मिळेल.
एसटी प्रशासनाने यंदा वारीच्या काळात विशेष नियोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, “वारकऱ्यांना चांगल्या सोयी-सुविधांसह सेवा देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.