सांगलीमध्ये जागेबाबत विश्वजीत पाटील यांची मागणी योग्य; पण आता वाद वाढवायचा नाही; वडेट्टीवारांचा सल्ला

0
12

.
नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपासूनच सांगली मतदारसंघ मोठा चर्चेत होता. सांगलीवरुन महाविकास आघाडीमधली धुसफुस सर्वासमोर आली होती. दरम्यान उद्धव ठाकरेंनी चर्चा सुरू असताना परस्पर सांगलीच्या जागेवर उमेदवाराची घोषणा केली. त्यावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावरून अनेक दावे प्रतिदावे आणि आरोपांच्या फैरीही झाडल्या गेल्या. मात्र यात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील यांचा पराभव केला.

असे असले तरी सांगलीची जागा अद्याप चर्चेचे कारण ठरत असताना, यात राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य करत सांगलीच्या जागे संदर्भात भाष्य केले आहे. यात त्यांनी विश्वजीत पाटील यांची मागणी योग्य होती. तिथे काँग्रेसची ताकत होती. मात्र, आघाडीत काही गोष्टी घडत असतात. आता निवडणूक संपल्यानंतर आम्हाला वाद वाढवायचा नाही. परिणामी सगळ्यांनी पुढील निवडणुकांची तयारी करावी, असा सल्ला देत या वादावर पर्दा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

विश्वजीत कदमांचा दावा योग्य, पण आता वाद वाढवायचा नाही
लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेला आणि जागावाटपामध्ये वादग्रस्त ठरलेला मतदारसंघ म्हणजे सांगली. महाविकास आघाडीने राज्यभर समन्वय साधून, भाजपविरोधात एकदिलाने काम केलं असलं तरी सांगलीत मात्र त्यांची दिलजमाई झाली नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यातील तिरंगी लढतीत विशाल पाटलांनी बाजी मारली. त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य करत सांगलीच्या जागे संदर्भात विश्वजीत कदमांचा दावा योग्य होता, पण आता वाद न वाढवता पुढील निवडणुकांची तयारी करावी असा सबुरीचा सल्ला वडेट्टीवारांनी दिला आहे.

नेत्याला पक्षात घेऊन त्याला संपवायचे ही भाजपची परंपरा
एखाद्या नेत्याला पक्षात घेऊन त्याला संपवायचे ही भाजपची परंपरा झाली आहे. अशोक चव्हाण  यांचा भाजप प्रवेश हाच प्रक्रियेचा भाग असल्याची खोचक टीकाही विजय वडेट्टीवार  यांनी केली. ते म्हणाले की जर तुम्हाला माहिती होते त्यांना पक्षात सामील करून घेतल्याने पक्ष पराभूत होणार आहे तर कशाला घेतलं? अशी विचारणा त्यांनी केलीय. इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेऊन त्यांच्या भरवशावर सामोरे जायचं आणि मग त्यांना संपवायचे, ही भाजपची जुनी पद्धत असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

‘हा’ प्रचार खोटा कसा होऊ शकतो
खोटारडेपणा कोणी केला? दहा वर्ष कोणी फसगत केली, संविधान बदलण्याची भाषा कोणत्या पक्षाची होती? शेतकरी उध्वस्त झाला याला कोण जबाबदार? महागाई वाढली, उद्योगपतींचे कर्ज माफ केली, हा प्रचार खोटा कसा होऊ शकतो याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे म्हणत भाजपकडून खोटा प्रचार करण्यात आलेल्या टीकेलाही वडेट्टीवार यांनी उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सुद्धा यात्रा काढू, असेही ते म्हणाले. जिथे जिथे खोटे सांगण्याचा प्रयत्न करतील तिथं आम्ही खरं सांगण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here