विनेशला मिळणार सुवर्णपदक; कधी, कुठे आणि कोणाकडून मिळणार..

0
2074

विनेश फोगटला फायनलसाठी अपात्र ठरवल्याच्या आयओसीच्या निर्णयाविरोधात सीएएसमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत त्यांनी संयुक्त रौप्यपदकाची मागणी केली होती. मात्र सीएएसने युनायडेट वर्ल्ड रेसलिंग (UWW) आणि IOC चा निर्णय मान्य करत विनेशची याचिका फेटाळली होती. या निर्णयाने तिला मोठा धक्का बसला होता. रौप्यपदक न मिळाल्याचं दु:ख तिने व्यक्त केलं होतं. भारतीयांची मान उंचावणाऱ्या विनेशला दु:खी पाहून हरयाणाच्या खाप पंचायतने तिला सुवर्णपदक देण्याचं आश्वासन दिलं आहे. रविवारी खाप पंचायतींनी घोषित केलं की ते विनेशला सुवर्णपदक देऊन सन्मानित करतील. हे पदक ऑलिम्पिकमधील विजेत्यांना प्रदान केलेल्या सुवर्णपदकाच्या बरोबरीचं असेल, असंही ते म्हणाले.

सांगवान खापचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार सोंबीर सांगवान आणि इतर खाप नेत्यांनी रविवारी बलाली या विनेशच्या मूळ गावी तिची भेट घेतली. त्याचप्रमाणे 25 ऑगस्ट रोजी रोहतकमध्ये तिच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमासाठी त्यांनी तिला आमंत्रित केलं. या कार्यक्रमात हरयाणा आणि इतर उत्तरेकडील राज्यांतील खाप सहभागी होणार असल्याची माहिती सांगवान यांनी दिली. “ऑलिम्पिकमध्ये विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकाप्रमाणेच आम्ही सुवर्णपदक बनवू. त्याचं वजन 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम असू शकतं”, असं सांगवान म्हणाले.

“100 ग्रॅम जास्त वजन भरल्याच्या कारणाने कुस्तीपटूला स्पर्धेतून अपात्र ठरवण्याचा प्रकार असह्य आहे. तिच्याविरुद्ध कट रचला गेला यात काही शंका नाही. पण ऑलिम्पिकमध्ये तीन सामने जिंकून तिने कोट्यवधी लोकांची मनं जिंकली आहेत. म्हणूनच प्रत्येक भारतीय तिला सुवर्णपदक विजेत्यापेक्षा जास्त सन्मान देत आहेत”, असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here