
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांविरोधात संतप्त शब्दांत आवाज उठवत, “मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही”, असे विधान केल्याने वातावरण चांगलेच तापले. या असंसदीय वर्तनाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचे दिवसभरासाठी निलंबन जाहीर केले.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी अलीकडच्या काळात शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांचा मुद्दा उपस्थित करत नाना पटोले यांनी सभागृहात संतप्त भूमिका मांडली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेतकऱ्यांची माफी मागण्याची मागणी केली.
विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. खुद्द नाना पटोले हे अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन आक्रमकपणे बोलू लागले. अध्यक्षांनी शांतता राखण्याचे वारंवार आवाहन केले, मात्र गदारोळ कायम राहिल्याने सभागृह पाच मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.
स्थगनानंतर कामकाज पुन्हा सुरू झाले, पण गदारोळ तसाच सुरू राहिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भावना व्यक्त करणं वेगळं, पण अध्यक्षांवर धावून जाणं अत्यंत अशोभनीय आहे. नाना पटोले हे स्वतः माजी अध्यक्ष आहेत, त्यांचं हे वर्तन सभागृहाच्या मर्यादा ओलांडणारं आहे. त्यांनी माफी मागावी.” यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करत असल्याचं जाहीर केलं. यावर निषेध नोंदवत विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी करत एक दिवसासाठी कामकाजावर बहिष्कार टाकला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या आमदाराला निलंबित करण्यात आलं. हे दुर्दैवी असून सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे.” विधानसभेतील हा गोंधळ सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाढत्या तणावाचे प्रतीक ठरत असून पुढील दिवसांत अजून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.