माणदेश एक्सप्रेस/मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीत खटके उडायला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील तिनही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आहेत. यातच पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची महत्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असल्याचं बोललं जातं.
तसेच मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. दरम्यान, असे असताना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक आमच्या (शिंदे गटाच्या) आणि भाजपाच्या संपर्कात असल्याचं विधान प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा रंगली आहे.
“शिवसेना ठाकरे गटाचे ३६ माजी नगरसेवक आमच्याकडे आले आहेत. तसेच अजूनही काही माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, तर काही माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत. मात्र, जेव्हा महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील तेव्हा तुम्हाला चित्र दिसेल की ठाकरे गटाकडे स्वत:चे फक्त काहीच नगरसेवक राहतील.