
माणदेश एक्सप्रेस न्युज|नाशिक : नाशिक जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सुधाकर बडगुजर यांनी काल मनातील नाराजी, खदखद बोलून दाखवली होती. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला आलेले, त्यावेळी बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती. पक्षाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा सुधाकर बडगुजर यांनी काल गौप्यस्फोट केला होता. आज ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली.
सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीसंबंधीत आज सकाळी संजय राऊत यांनी काही वक्तव्य केली होती. “एखाद-दुसऱ्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली, म्हणून संपूर्ण शिवसेनेत फाटाफूट आहे. व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही. त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्याइतपत प्रतिष्ठा त्या पक्षाने दिलेली असते” असं संजय राऊत म्हणाले होते. “आज पक्ष अडचणीत आहे. लोकांना लाभ हवे आहेत. त्या लाभासाठी लोक पक्ष बदलत आहेत. कोणत्या महान विचाराने कोणी पक्ष सोडला असेल तर माल सांगाव. सुधाकर बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नाही” असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
“मीच नाही, तर पक्षात 10 ते 12 जण नाराज आहेत. संजय राऊत यांच्यावर नाराजी नाही. पक्ष संघटनेत बदल करतांना विश्वासात घेतले नाही म्हणून नाराजी आहे. महानगरप्रमुख विलास शिंदे देखील नाराज आहेत” असं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं होतं. “पक्षासाठी एवढं काम केलं. आम्ही वातावरण बदलवून खासदार निवडून आणला. याबाबत वेळोवेळी वरिष्ठांना सांगितलं. अनेकदा सुधारणा करावी अशी मागणी केली. पण अजून काही बदल दिसत नाही. विलास शिंदेंची इच्छा होती, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा. पण तसे झाले नाही. माझी नाराजी स्वतःवर आहे” असं सुधाकर बडगुजर म्हणाले होते.