बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार

0
553

मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शाळेसमोर हजारोंच्या संख्येने पालक, राजकीय मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन सुरु केले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आले होते.

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन मुलींचे कंत्राटी सफाई कामगाराने शारीरिक शोषण केल्याने पालकवर्ग हादरला होता. या प्रकरणात अखेर 4 दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली असून शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित, तर वर्गशिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. तर आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता त्याच्यासोबतचा करारही शाळेने रद्द केला असून शाळेच्या सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे.

बदलापूर शहरातील एका जुन्या आणि नामांकित शाळेत हा संतापजनक प्रकार घडला होता. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) हस्तक्षेपानंतर रात्री एक वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यावरून पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आज बदलापूर बंदची हाक दिली आहे आंदोलन सुरु असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शाळेचा माफीनामा
या सगळ्या प्रकारानंतर शाळेकडून एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, घडलेला प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय आहे. या प्रकारानंतर सबंधित आरोपी विरुद्ध कारवाई करण्यासाठी पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना सहकार्य केले. या घटनेनंतर सबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे, असे शाळेने निवेदनात म्हटले आहे.

पूर्व प्राथमिक आणि शिशु वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या आणि सांभाळ करण्याच्या दृष्टीने फक्त महिलांचीच नेमणूक केली जाणार आहे. या प्रकरणात पालकांना झालेल्या मनस्तापाबद्दल संस्थेने त्यांची जाहीर माफी मागितली असून त्यांना कायदेशीर मदत देऊ केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व पालक, विद्यार्थी आणि शहरातील सजग नागरिकांना संस्थेने शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी संस्था तयार असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल यांनी सांगितले आहे.

शाळेच्या गेटवर पालकांची मोठी गर्दी
हे प्रकरण इतकं संवेदनशील असतानाही बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकानी गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तासांचा अवधी घेतला . शिवाय शाळा प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पालकांनी मंगळवारी सकाळी आक्रमक होत शाळेला जाब विचारण्यासाठी शाळेच्या गेटवर मोठी गर्दी केली आहे. शाळा प्रशासनाने येऊन आमच्याशी बोलावं अशी पालकांची मागणी आहे. त्याचबरोबर आज नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे ,या बदलापूर बंदमध्ये रिक्षा चालक, व्यापारी संघटना,शाळा बस चालक देखील सहभागी झालेत. घटनास्थळी सध्या पालक वर्ग शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आहेत.