बीड लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त ठरलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बदली

0
26

माणदेश एक्सप्रेस न्युज : बीड : बीड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक ही जाती-पाती वर गाजली. यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी यामुळे निवडणुकीला वेगळे वळण लागले होते. तसेच निवडणूक मतदान केंद्रावरील बोगस मतदान आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचा वाढता हस्तक्षेपाच्या आरोपामुळेही गाजली.

निवडणूक मतमोजणी प्रक्रियेत अनेक शासकीय अधिकाऱ्यांवर शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता. अशातच आता निवडणुकीच्या निकालानंतर महिनाभरातच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्यावर शरद पवार गटाने गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे त्या चांगल्याच वादग्रस्त ठरल्या होत्या. इतकंच नव्हे तर आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मतमोजणीवेळी तहसिलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सहभागी न होऊ देण्याची मागणी देखील निवडणूक आयोगाकडे केली होती.

परंतु आता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांची बीड जिल्हाधिकारी पदावरुन बदली करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या सहीने त्यांची बदली करण्यात आल्याचं पत्र पाठवण्यात आलं आहे. दीपा मुधोळ-मुंडे यांच्या बदलीनंतर आता बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाठक हे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here