वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी ठाकरे गटाला रामराम. 2014 ते 19 या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार होते, 2019 ला त्यांनी वैजापूर विधानसभेची जागा आपल्या पुतण्यासाठी सोडली होती. मात्र, शिवसेना फुटीनंतर काही दिवसांतच म्हणजेच, 2 वर्षांपूर्वी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता, आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने त्यांनी आता पक्ष सोडला आहे. त्यामुळे, ते आता कोणत्या पक्षात जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण, ठाकरेंची शिवसेना सोडल्यामुळे आता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. कारण, ज्या कारणामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती, ते ठोंबरे काका-पुतणे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात कार्यरत आहेत. त्यामुळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांना स्पेस दिसते. मात्र, महाविकास आघाडीतही विधानसभा निवडणुकांचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांना राजकीय संघर्ष करावा लागणार आहे.
मी पक्षासाठी गेली दोन वर्ष काम करतोय, मात्र ते नवख्या उमेदवाराला उमेदवारी देणार असल्याचे समजते. मग या पक्षात राहून फायदा तरी काय असा सवाल करत भाऊससाहेब चिकटगावकर यांनी शिवसेना ठाकरे पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपली पुढील राजकीय भूमिका ते लवकरच स्पष्ट करणार आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडीतील ठाकरेंना सोडून पवारांची तुतारी वाजवणार की महायुतीतील शिवसेना पक्षात जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.
दोन वर्षांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी ‘घड्याळाला’ सोडचिठ्ठी देऊन ठाकरेसेनेची ‘मशाल’ हाती घेतली होती. 14 डिसेंबर 2022 रोजी मुंबईतील ‘मातोश्री’ बंगल्यावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिकटगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता. काँग्रेस नेते भाऊसाहेब ठोंबरे यांच्यासह त्यांचे पुतणे उल्हास ठोंबरे व पंकज ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर चिकटगावकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. तत्पूर्वी, ठोंबरेंचा प्रवेशसोहळा रोखण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे, चिकटगावकर यांनी शिवसेनेची मशाल हाती घेतली होती. मात्र, महाविकास आघाडीत वैजापूरची जागा ठाकरेंच्या शिवसेनाला सुटत नसल्याने आता ते शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत.