भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यास अवघा एक आठवडा शिल्लक आहे. त्याआधी, शुक्रवारी भारतीय संघातील सर्वच खेळाडू चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम मैदानावर एकत्र आले. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सर्व खेळाडूंकडून कसून सराव करून घेतला.
बीसीसीआयने एक्सवर खेळाडू सराव करताना काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलही (Morne Morkel) दिसला. मॉर्नी मॉर्केल हा टीम इंडियाचे (Team India) नवीन गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. त्याच्या येण्याने गोलंदाजांना मोठा फायदा होईल. विशेष म्हणजे मॉर्नी मॉर्केल हा पाकिस्तान क्रिकेट संघाचाही प्रशिक्षकही राहिला आहे.
युवा गोलंदाजांना होणार फायदा-
काही दिवसांपूर्वीच मॉर्नी मॉर्केलला टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले. मॉर्नी मॉर्केल मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत काम करेल. मॉर्नी मॉर्केलच्या आगमनाने वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा होऊ शकतो. मॉर्नी मॉर्केल अनुभवी असून त्याच्या कारकिर्दीत तो अत्यंत भेदक मारा करणारा गोलंदाज होता. भारताच्या युवा गोलंदाजांसाठी मॉर्नी मॉर्केल अधिक उपयुक्त ठरेल. मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि यश दयाल यांच्यासाठी ही चांगली संधी असेल.
मॉर्नी मॉर्केलची कारकीर्द-
मॉर्नी मॉर्केलची कसोटी कारकीर्द चांगली राहिली आहे. त्याने 86 सामन्यात 309 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 23 धावांत 6 विकेट्स घेणे ही एका डावातील त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मॉर्नी मॉर्केलने 117 एकदिवसीय सामन्यांमध्ये 188 विकेट्स घेतल्या आहेत. तर 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 47 विकेट्स, घेतल्या आहेत. मॉर्केलने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे.
पाकिस्तानचा माजी प्रशिक्षक म्हणून बजावली भूमिका-
मॉर्केल पाकिस्तान क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षकही राहिला आहे. यासोबतच त्याचा आयपीएल संघ लखनौ सुपर जायंट्सच्या कोचिंग स्टाफमध्येही समावेश करण्यात आला होता. मॉर्केल आणि गंभीर यांनी 2022-23 मध्ये लखनौसाठी एकत्र काम केले आहे. मॉर्केल दक्षिण आफ्रिका 20 लीगमध्ये देखील डर्बन सुपर जायंट्सचे प्रशिक्षक होता.
बांगलादेशचा कसोटी मालिकेसाठी
संपूर्ण संघ:
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन कुमेर दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, मोहम्मद. सय्यद खालेद अहमद, जाकेर अली आनिक
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.