देशातील लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार ऐन रंगात आलाय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारात अग्नीवीर योजनेचा मुद्दा प्रचंड गाजतोय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं अग्निवीर योजनेवरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या अनेक भाषणांमध्ये बोलताना राहुल गांधी सातत्यानं अग्नीवीर योजना बंद करण्यात यावी, असं म्हणाले आहेत. यावर आता भाजपनं राहुल गांधींना फैलावर घेतलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींनी आधी सैन्यात नोकरी करावी, लष्कराला समजून घ्यावं आणि त्यानंतरच अग्नीवीर योजनेबाबत बोलावं, असं भाजपनं म्हटलं आहे. काँग्रेस पक्षानं लष्कराला बुलेटप्रूफ जॅकेट आणि दारूगोळाही दिला नसल्याचं भाजपनं म्हटलं आहे.
राहुल गांधी त्यांच्या आईवर ओझं : हेमंत बिसवा
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, अग्निवीर योजनेंतर्गत लोकांना प्रथम सैन्यात नोकरी मिळेल आणि नंतर राज्य पोलिसांत नोकरी मिळू शकेल. तरुणांना ही योजना आवडते, त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येनं तरुण मुलाखती देण्यासाठी येत आहेत. राहुल गांधींवर निशाणा साधत ते म्हणाले की, “राहुल ना सैन्यात भरती होऊ शकतात, ना अग्निवीर होऊ शकतात. ते स्वत: काहीही कमवू शकत नाहीत आणि खाऊ शकत नाहीत. ते त्यांच्या आईवर ओझं आहेत. ते देशद्रोहाचं कृत्य करतायत. मी त्यांना ताकीद देतो की, सैन्याबद्दल काहीही चुकीचं बोलू नका.”
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर बोलताना म्हणाले की, काँग्रेसनं देशात गोंधळ घालणं थांबवावं, काँग्रेसने बोफोर्स, जीप, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा केला. काँग्रेसने लष्कराला काहीही दिले नाही. लष्कराला वन रँक, वन पेन्शन दिली गेली नाही, तर मोदी सरकारने लष्कराला बुलेटप्रूफ जॅकेट, शस्त्रे आणि दारूगोळा दिला. अग्निवीर योजनेत 100 टक्के नोकरीची हमी आहे. 75 टक्के अग्निवीर सैनिक चार वर्षे सैन्यात राहतील आणि त्यानंतर त्यांना पोलीस विभाग आणि खासगी क्षेत्रात मागणी असेल, असं अनुराग ठाकूर म्हणाले आहेत.
त्याचवेळी जनरल व्हीके सिंह म्हणाले की, मी राहुल गांधींना सल्ला देतो की, आधी सैन्यात सेवा करा आणि मग लष्कराबद्दल बोला. आधी सैन्य समजून घ्या मग बोला. त्याच्या टिप्पणीचा काही फायदा नाही.
अग्नीवीरबद्दल राहुल गांधी काय म्हणतात?
लोकसभा निवडणूक जिंकून इंडिया ब्लॉक सत्तेत आल्यास अग्निवीर योजना रद्द करून डस्टबिनमध्ये फेकून देऊ, असं काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्यानं सांगत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘भारतातील सैनिकांना मजुरांमध्ये रूपांतरित केलंय’, अशी टीकाही केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारनं 2022 मध्ये तीनही सेवांमधील वयोमर्यादा कमी करण्याच्या उद्देशानं सशस्त्र दलांमध्ये अल्पकालीन सैनिकांच्या समावेशासाठी ‘अग्नीवीर भरती योजना’ सुरू केली होती. या योजनेंतर्गत, साडेसतरा ते 21 वर्ष वयोगटातील तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती केलं जातं, त्यापैकी 25 टक्के सेवा 15 वर्ष सुरू ठेवण्याची तरतूद आहे.