एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची संख्या पूर्वी एक लाखाच्या आसपास होती. आता एसटी महामंडळात 87 हजार कर्मचाऱ्यांची संख्या आहे. या चालक आणि वाहकांची संख्या सर्वाधिक आहे.या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना अनेकदा गोंधळ उडत असतो. त्यामुळे या कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळातील चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबतचे विविध तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी या नव्या पध्दतीने शक्य होणार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे.
एसटी महामंडळामध्ये सुमारे 87 हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहे. एक मध्यवर्ती कार्यालय, सहा प्रदेश, त्या प्रदेशांतर्गत ३१ विभाग आणि या विभागांतर्गत कार्यरत असलेले 251 आगार आहेत. या बरोबरच तीन मध्यवर्ती कार्यशाळा, 9 टायर पुनर्स्त:रण प्रकल्प आणि एक मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था असा एसटी महामंडळाचा अवाढव्य पसारा आहे. या सर्व आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी गंभीर आजारपण, पती-पत्नी एकत्रीकरण, आपापसातील बदली अशा अनेक कारणास्तव विनंती बदलीचे अर्ज त्यांच्या कार्यालयीन प्रमुखांकडे सादर करी असतात. परंतु विविध प्रकारच्या हस्तक्षेपामुळे, बदल्यांमध्ये अनियमितत होत असल्याचा आरोप नेहमी केला जातो. परिणामी, कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे न्याय मिळत नाही. अनेक कर्मचाऱ्यांचे विनंती बदली अर्ज वर्षानुवर्ष धुळखात पडलेले असतात. याला आळा घालण्यासाठी आणि सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय मिळण्याच्या हेतूने महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या विशेष पुढाकाराने बदल्या संदर्भातील संगणकीय प्रणालीव्दारे ॲप एसटीमहामंडळाकडून विकसीत करण्यात येत आहे.
आधुनिक तंत्राचा फायदा
या ॲपव्दारे विभागांतर्गत एका आगारातून दुसऱ्या आगारात, प्रदेशांतर्गत एका विभागातून दुसऱ्या विभागात आणि राज्यात एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात विनंती बदलीचे ( एकाच पदात एक वर्ष पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे ) अर्ज भरून घेण्यात आले आहेत. संबंधित कर्मचाऱ्याला विनंती बदलीमध्ये तीन पर्याय देण्याची मुभा देण्यात आलेली आहे. बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी भविष्यात संगणकीय ॲप पध्दतीचा मोठा फायदा होणार आहे. विविध जात प्रवर्ग, बिंदु नामावली विचारात घेवून रिक्त पदाच्या ठिकाणी सेवा जेष्ठतेनुसार बदल्या करण्याची संगणकीय पध्दत एसटी महामंडळाने स्विकारली आहे. सबब, कर्मचाऱ्यांना समान न्याय देण्याबरोबरच महामंडळाच्या मनुष्यबळाचा क्षेत्रनिहाय समसमान वापर करण्यासाठी देखील हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. लवकरच या संगणकीय ॲपव्दारे बदलीची प्रक्रीया सुरू करण्यात येणार आहे.