
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : मुंबई हल्ल्यातील एका आरोपीला भारतात आणलं गेलं असेल तर प्रशासनाचे आणि तपास यंत्रणांचे कौतुक केलं पाहिजे. त्यासाठी भाजपने क्रेडिट घ्यायचं कारण काय आहे असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला. या आधीही अबू सालेमला भारतात आणलं गेलं तेहीही कायदेशीर प्रक्रियेनेच. तसेच या तहव्वूर राणाचं आहे. त्याचा फेस्टिवल करू नका असा टोला संजय राऊत यांनी लगावला. भाजपला जर राणाचं क्रेडिट घ्यायचं असेल तर त्यांनी पुलवामा हल्ल्याचंही क्रेडिट घेतलं पाहिजे, भाजपने पाकिस्तामध्ये अडकलेल्या कुलभूषण जाधवांनाही परत आणावं असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, राणाला भारतात आणलंय पण क्रेडिट का घेताय? देशाच्या सुरक्षेची काळजी असेल तर पुलवामाचे क्रेडिट घ्या, कुलभूषण जाधवांना परत आणा. मेहूल चोक्शी, निरव मोदीला घेऊन या. भाजपवाले सगळे मुहूर्त बघून निर्णय घेतात. ज्या दिवशी टॅरिफ लावलं त्या दिवशी यांनी वक्फ बिल आणलं. आता बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधी राणाला फासावर चढवतील आणिदेशात राणा फेस्टिवल घेतील असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
संजय राऊत म्हणाले की, “राणाला भारतात आणल्यानंतर एवढं क्रेडिट घेणाऱ्या भाजपवाल्यांना माहिती पाहिजे की या आधीही अनेकांना भारतात आणलं गेलंय. या आधी अबू सालेमला भारतात आणलं. राणाला आणण्यासाठी 2009 पासून सातत्याने भारत सरकार प्रयत्न करत आहे. 2009 साली राणा आणि हेडली विरोधात एनआयएने पहिला एफआयआर दाखल केला. एनआयएचे पथक शिकागोला जाऊन राणा आणि हेडलीची चौकशी केली. 2012 साली त्यावेळचे परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शिद अमेरिकेला गेले आणि राणाला भारतात आणण्यासाठी चर्चा केली. ही एक प्रक्रिया आहे. कुणालाही भारतात आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाते. हे आपलं भारत सरकारचं यश आहे. त्याचा कोणत्याही पक्षाचा संबंध नाही. आताही तेच केलं.
केंद्रीय मंत्री अमित शाहांचा महाराष्ट्र दौऱ्यावर संजय राऊतांनी टीका केली. राज्यात सुरू असलेली गुन्हेगारी, कायदा आणि सुव्यवस्थेची मोडकळीस आलेली स्थिती पाहण्यासाठी अमित शाह महाराष्ट्रात येत असतील असा टोला संजय राऊत यांनी लगावला.