पुतळा हटवला, पण लढा नाही थांबला!

0
624

गोपीचंद पडळकरांचा आंदोलनाला पाठींबा

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरात बसविण्यात आलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा प्रशासनाने मध्यरात्री गुपचूपपणे हटविल्याच्या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकाराचा तीव्र निषेध करत आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आटपाडी येथून थेट मुंबईकडे लॉंग मार्च करत निघाले आहेत. संविधान व बाबासाहेबांचा अपमान झाल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

 

या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असून, मार्गातील अनेक गावांमध्ये आंदोलनकर्त्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे. फलटण तालुक्यातील दुधेभावी या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

 

यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या ठिकाणीच परत बसवला जाईल. या लढ्यात मी तुमच्या सोबत आहे. बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.” त्यांच्या या आश्वासनामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

 

प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता रात्रीच्या अंधारात पुतळा हटवणे ही लोकशाहीची खिल्ली उडवणारी कृती आहे. “ही केवळ बाबासाहेबांचा नव्हे, तर संविधानाच्या मूल्यांचीही अवहेलना आहे,” असे आंदोलकांनी स्पष्ट केले. दरम्यान, या घटनेने आटपाडी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासन सतर्क आहे. आंदोलकांनी शांततेत आणि संविधानिक मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here