रणजी ट्रॉफी २०२४-२५ चा हंगाम यंदा दोन भागात विभागून आयोजित केला आहे. पहिली फेरी ११ ऑक्टोबर २०२४ ते १६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत खेळवली गेली आणि आता दुसरी फेरी २३ जानेवारी ते २ मार्च या कालावधीत होणार आहे. या दुसऱ्या हंगामातील सामने फारच रोमांचक असणार आहेत. यामागील कारण म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी उतरणार आहेत.
स्टार फलंदाज विराट कोहली २०१२ नंतर रणजी ट्रॉफीमध्ये पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ३० जानेवारीपासून रेल्वेविरुद्ध दिल्लीच्या सामन्यासाठी त्याने स्वत:ला उपलब्ध करून दिले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माही १० वर्षांनंतर मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये सहभागी होणार आहे. रोहित शर्मा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघात जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळणार आहे. रोहितशिवाय यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर हे खेळाडूदेखील खेळणार आहेत.
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानेही राजकोटमधील सौराष्ट्र संघाच्या सराव सत्रात भाग घेतला आणि २३ जानेवारीपासून दिल्लीविरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी सामन्यात तो खेळणार आहे. जानेवारी २०२३ मध्ये जडेजा सौराष्ट्रकडून शेवटचा सामना खेळला होता. शुबमन गिल पंजाबकडून तर ऋषभ पंत दिल्लीकडून रणजी सामना खेळणार आहे. गिल २३ जानेवारीला सुरू होणाऱ्या पंजाब वि कर्नाटक सामन्यात खेळताना दिसेल. ऋषभ पंतने २३ जानेवारीपासून राजकोट येथे सुरू होणाऱ्या सौराष्ट्र विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या आगामी रणजी ट्रॉफी सामन्यासाठी स्वतःला उपलब्ध केले आहे.