
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये होणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी २०२५ असे तीन दिवसीय हे संमेलन होणार आहे. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनापुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी केली.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचे औचित्य साधून जगभरात मराठी साहित्य पोहचविण्यासाठी कार्य करणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करण्याचा निर्णय या वर्षापासून घेण्यात आला आहे. या पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून मधू मंगेश कर्णिक यांची निवड सर्वानुमते करण्यात आल्याचेही सामंत यांनी सांगितले.
पुण्यात होणाऱ्या या संमेलनाला परदेशातून ५०० हून अधिक नागरिक आणि साहित्यिक येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. शोभायात्रेने संमेलनाची सुरुवात झाल्यानंतर उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच जगभरातील बृहन्मंडळांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल विशेष परिसंवाद होईल.
१५० पुस्तकांचे स्टॅाल्स लावण्यात येणार असून, पुस्तक आदान-प्रदान हा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदी मान्यवरांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.