
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई– महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा अनुभव देणारी विशेष ‘भारत गौरव’ पर्यटक ट्रेन आजपासून सुरू होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने भरलेली ही ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ टूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शुभारंभ करण्यात आली.
ही विशेष ट्रेन महाराष्ट्र शासन, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (IRCTC) आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली आहे. पाच दिवसांच्या या ऐतिहासिक प्रवासात पर्यटकांना छत्रपती शिवरायांच्या जीवनाशी निगडित महत्वाच्या गड-किल्ल्यांना भेट देता येणार आहे.
प्रमुख स्थळांचा समावेश
या पर्यटनात खालील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे:
शिवनेरी किल्ला – शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ
लाल महाल व शिवसृष्टी, पुणे – बालपण व जीवनदृष्टीचा प्रवास
रायगड – शिवराज्याभिषेकाचे पवित्र स्थळ
प्रतापगड – अफझल खानावरील विजयाचा ऐतिहासिक साक्षीदार
भीमाशंकर – १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक
कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर
पन्हाळा – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले की, “ही टूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी आहे. पर्यटकांना महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची अनुभूती देत सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.”
पर्यटन, इतिहास आणि श्रद्धेचा संगम
या टूरमध्ये पर्यटकांना रेल्वे स्थानकांपासून थेट गडकिल्ल्यांपर्यंत नेण्याची व्यवस्था आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटन स्थळांना अधिक प्रसिद्धी मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. ही सफर केवळ पर्यटनाची नसून, शिवचरित्राच्या तेजस्वी वारशाची साक्ष देणारा एक प्रेरणादायी प्रवास ठरणार आहे.