लग्न,संसार म्हटलं की प्रेम येतंच पण पती-पत्नीमधली भांडणही कॉमनच असतात. काही वेळा हे भांडण पटकन सुटतात, पण काही वेळा रागाच्या भरात अशी कृती केली जाते की अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होतं. उत्तर प्रदेशातील औरिया मध्येही अशीच एक घटना घडली, जिथे पत्नीला घेऊन जाण्यासाठी सासारी आलेल्या पतीने आधी पत्नीवर नंतर स्वत:वर बेछूट गोळीबार केला. या दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला. त्यापूर्वी त्याने पत्नीवरही गोळ्या झाडल्या, पण ती कशीबशी जीव वाचवून पळाली. सध्या पोलिसांनी त्या इसमाचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. आपापसातील वादांमुळे हे हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे.
खरंतर हे संपूर्ण प्रकरण औरेया जिल्ह्यातील बिधूना कोतवालीच्य़ा रतनपूर येथील आहे. एटा येथील विक्रम हा त्याची पत्नी पूजाला घेऊन जाण्यासाठी सासरी आला होता. मात्र त्याच्या पत्नीने घरी जाण्यास नकार दिला ते ऐकून तिचा नवरा, विक्रम एवढा भडकला की तो रागारागात चालत बाईकजवळ गेला, तेथील डिक्कीतून बंदूक काढली आणि पूजावर थेट फायरिंग केले. गोळीबार होताच तिथे एकच कल्लोळ माजला. पूजाने तेथून कसाबसा पळ काढला आणि तिचा जीव वाचवला.
मात्र त्यानंतरही विक्रम थांबला नाही. त्याने त्याच बंदुकीतून स्वत:वरही गोळ्या झाडल्या आणि तो धाडकन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
गोळीबाराचं कारण काय?
मिळालेल्या माहितनुसार, विक्रम आणि पूजाचं लग्न 2009 साली झालं, त्यांना दोन मुलंही आहेत. काही दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये एका मुद्यावरून वाद झाला आणि पूजा तिच्या माहेरी (औरैया) निघून आली. आठवड्याभरापूर्वी विक्रम एटा येथून त्याची पत्नी आणि मुलाला घ्यायला आला, पण तेव्हाही पूजाने सासरी येण्यास नकार दिला, फक्त मुलाला पाठवून दिलं. त्यानंतर 27 मे रोजी विक्रम पुन्हा सासरी गेला आणि पत्नीला घरी येण्यास सांगितलं. पण तेव्हाही तिने टाळमटाळ केली, ज्यामुळे विक्रम भडकला आणि त्याने बाईकमधूल बंदूक काढून बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यातून पूजा कशीबशी जीव वाचवून पळाली पण विक्रमने स्वत:च्या डोक्यात गोळी मारून घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
गोळीबाराचा आवाज ऐकताच आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. घटनास्थळावरीन पोलिसांनी बंदूक आणि जिवंत काडतुसं हस्तगत केली आहेत. पुढील तपास सुरू आहे.