झंझावाती फटकेबाजीने मैदान गाजवले! “या” क्रिकेटरची तुफानी खेळी

0
204

माणदेश एक्सप्रेस न्यूज|पुणे– आयपीएल २०२५ मध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या बॅटचे जादू दाखवले. इंग्लंड दौऱ्यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे मंगळवारी पार पडलेल्या सराव सामन्यात त्याने अवघ्या ९० चेंडूत १९० धावा करत सर्वांची मने जिंकली. या खेळीमुळे मैदानात षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला.

 

राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या आणि सध्या भारताच्या अंडर-१९ संघात निवड झालेल्या वैभवने इंग्लंड दौऱ्यापूर्वी दिलेले हे सशक्त फलंदाजीचे संकेत संघासाठी मोठी दिलासा ठरत आहेत. भारताचा अंडर-१९ संघ २४ जून ते २३ जुलैदरम्यान इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, या दरम्यान पाच एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशी डावाची सुरुवात कर्णधार आयुष म्हात्रेसोबत करणार आहे.

 

फटकेबाजीचा बादशाह म्हणून नावारूपाला येत असलेल्या वैभवने याआधी आयपीएलमध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूत शतक ठोकून विक्रमी कामगिरी केली होती. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणारा फलंदाज म्हणून त्याने इतिहास रचला आहे.

 

मंगळवारीच्या सराव सामन्यातही त्याची तीच तडाखेबाज शैली दिसून आली. लाँग-ऑन आणि मिडविकेटच्या दिशेने त्याने लगतच्या षटकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच्या या खेळीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, क्रिकेट चाहत्यांमध्ये या नवोदित खेळाडूविषयी उत्सुकता वाढली आहे.

 

केवळ १२व्या वर्षी क्रिकेट क्षेत्रात पाऊल टाकून रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी हा भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी एक आश्वासक चेहरा ठरत आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याची कामगिरी सर्वांच्या नजरा वेधून घेणार यात शंका नाही.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here