
माणदेश एक्सप्रेस न्यूज|ठाणे– आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापत असतानाच, ठाण्यात ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने लावलेला वादग्रस्त बॅनर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. “देवेंद्र गंगाधर फडणवीस माझे वडील नाहीत,” अशा थेट आणि स्पष्ट शब्दांत लिहिलेल्या या बॅनरने ठाण्यात राजकीय खळबळ उडवून दिली आहे.
ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी तुषार दिलीप रसाळ यांनी हा भला मोठा बॅनर लावला. या बॅनरवर त्यांनी लिहिले आहे की, “मी दिवंगत दिलीप पंढरीनाथ रसाळ यांचा मुलगा आहे. देवेंद्र गंगाधर फडणवीस माझे वडील नाहीत.” या मजकुरातून त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप नेते नितेश राणे यांच्यावर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.
बॅनरवर पुढे लिहिले आहे – “दोन मराठी वाघ एकत्र येणे ही महाराष्ट्राची इच्छा आहे.” यावरून तुषार रसाळ यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन केल्याचे दिसते.
दरम्यान, ठाकरे व मनसे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अलीकडच्या काळात संपर्क वाढल्याचे चित्र असून, कल्याण-डोंबिवली परिसरात दोन्ही पक्षांनी काही आंदोलने एकत्रितपणे केली आहेत. त्यामुळे या बॅनरमुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. स्थानिक राजकीय नेत्यांनी या प्रकाराकडे तिरकस नजर टाकली असली तरी सामान्य नागरिकांमध्ये मात्र या बॅनरबाबत उत्सुकता आणि चर्चा सुरू आहे. निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारचे बॅनर राजकीय कुरघोडीचा भाग मानले जात आहेत.