क्रीडा लवादाचा निर्णय अखेर समोर! कुस्तीपटू विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही?

0
385

भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधून निराशाजनक बातमी समोर आली आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीला आता रौप्य पदकही मिळणार नाही. क्रीडा लवादाने ( कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) विनेश फोगाट हीची याचिका फेटाळली आहे. विनेशने वाढीव वजनानंतर अपात्रत ठरवल्यानंतर सीएएसमध्ये धाव घेतली होती. आपल्याला किमान संयुक्तरित्या रौप्य पदक देण्यात यावं, अशा मागणीची याचिका विनेशने केली होती. मात्र सीएएसने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे भारताला रौप्य पदक मिळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

आतापर्यंत काय काय झालं?
विनेशने मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी 50 किलो वजनी गटात सलग 3 सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. विनेश ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहचणारी पहिला महिला ठरली. विनेशने प्री क्ववार्टर फायनल सामन्यात टोक्यो ऑलिम्पिक चॅम्पियन यूई सुसाकी हीचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये युक्रेनच्या ओक्साना लिवाच हीचा 7-5 अशा फरकाने धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक दिली. तर सेमी फायनलमध्ये विनेशने क्यूबाच्या गुजमॅनवर 5-0 ने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. विनेशने यासह भारतासाठी रौप्य पदक निश्चित केलं. मात्र आता तिच्याकडून सुवर्ण पदकाची आशा होती. मात्र नियतीला ते मान्य नव्हतं. विनेशचा अंतिम फेरीतील सामना हा 7 ऑगस्ट रोजी यूएसएच्या एन सारा हिल्डेब्रांट विरुद्ध होणार होता. मात्र त्याआधी विनेशचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं निदर्शनात आलं. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं.

विनेशचं मंगळवारी सकाळी वजन हे 49.90 किलो इतकं होतं. रिपोर्ट्सनुसार, उपांत्य फेरीतील विजयानंतर विनेशला ताकदीसाठी तगडा आहार देण्यात आला. ज्यामुळे विनेशचं वजन हे 52.700 किलो इतकं झालं. त्यानंतर विनेशचं वजन कमी करण्यासाठी तिच्या मेडीकल टीमने आटोकाट प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश आलं. विनेशने 52.700 वरुन 50.100 पर्यंत वजन कमी केलं. मात्र 100 ग्राम जास्त वजन असल्याने तीला अपात्र ठरवण्यात आलं.

भारताला पदक नाहीच

त्यानंतर विनेशने सीएएस अर्थात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये धाव घेतली. सीएएसने विनेशची तिला अंतिम सामन्यात खेळू देण्याची मागणी फेटाळली. त्यामुळे विनेशने त्यानंतर आपल्याला संयुक्तरित्या रौप्य पदक विजेता घोषित करण्यात यावं, अशी मागणी केली. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी या प्रकरणी तब्बल 3 तास युक्तीवाद चालला. विनेश फोगाटकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया या दोघांनी युक्तिवाद केला. तर विनेश व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे आपली बाजू मांडली. तर ऑस्ट्रेलियाच्या डॉ एनाबेले बेनेट या प्रकरणात मध्यस्थाच्या (आर्बिट्रेटर) भूमिकेत होत्या. त्यानंतर क्रीडा लवादाने निर्णय 3 वेळा राखून ठेवला. या प्रकरणात 16 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी निर्णय अपेक्षित होता. मात्र त्याआधीच कुणाच्या ध्यानीमनी नसताना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला असा निर्णय आला. त्यामुळे विनेशच्या आणि पर्यायाने भारतीयांच्या पदरी निराशाच पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here