माणदेश एक्सप्रेस/मुंबई : धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायचा किंवा नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा आहे. संपूर्ण राज्यात चर्चा काय आहे, याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे. वातावरण दुरुस्त करायला राज्यकर्त्यांनी प्रयत्नांची तातडीने पराकाष्ठा केली पाहिजे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत सांगितले.
सरपंच हत्येनंतर मराठवाड्यातील काही भागात सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. ही बाब मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. इथे राजकारण न आणता समाजातील सर्व घटकात एकवाक्यता कशी करता येईल, याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, असेही शरद पवार म्हणाले.
इंडिया आघाडीत देशपातळीवरील निवडणुकीत एकत्र येण्याचा उल्लेख होता. राज्यातील विशेषतः स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत एकत्रित काम करावे, अशी चर्चा आमच्यात कधीही झालेली नाही. पण, आता राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यावर एकत्रित येण्याची भूमिका घेऊन त्यात सातत्य ठेवण्याची गरज आहे, तसा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल, असेही ते म्हणाले.