राजेंद्रआण्णा देशमुखांच्या उमेदवारीने पाटील,बाबर यांच्यापुढे आव्हान निर्माण

0
1773

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर विधानसभेसाठी आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. महायुती कडून सुहास बाबर तर महाविकास आघाडीकडून वैभव पाटील यांचे अर्ज दाखल आहेत. आटपाडी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांची उमेदवारी राहिल्याने महाविकास आघाडीचे वैभव पाटील व महायुतीचे सुहास बाबर यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

महायुती कडून सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी, त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने सुरुवातीला चौरंगी वाटणारी निवडणूक तिरंगी झाली आहे.

माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे राजेंद्रआण्णा देशमुख हे ‘तुतारी’ चिन्हावर लढणार असल्याचे फिक्स झाले होते. परंतु विट्याचे नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करत, उमेदवारी खेचून आणली.

आटपाडी येथे राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या गटाचा मेळावा सूतगिरणी येथे संपन्न झाला. यामध्ये सगळ्याच कार्यकर्त्यांनी राजेंद्रआण्णा देशमुख यांना अपक्ष लढण्याची विनंती केली होती. परंतु बैठकीत अमरसिंह देशमुख यांनी मात्र, मी भाजपमध्येच आहे असे सांगितल्याने, मोठा संभ्रम निर्माण झाला होता. शेवटी राजेंद्रआण्णा देशमुख यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत, उमेदवारी अर्ज भरण्याचे आश्वासन दिले होते.

कार्यकर्त्यांना दिलेल्या आश्वासनानंतर राजेंद्रआण्णा देशमुख यांनी अर्ज दाखल करत, आटपाडी तालुक्यात प्रचाराला सुरुवात देखील केली होती. तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय प्रचार यंत्रणा राबविली. त्यांचे प्रत्येक गावात जंगी स्वागत केले गेले. त्यामुळे राजेंद्रआण्णा देशमुख हे उमेदवारीवर ठाम राहणार असे तालुक्यात चित्र निर्माण झाले होते. त्यानुसार आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजेंद्रआण्णा देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने, महायुतीचे सुहास बाबर व महाविकास आघाडीचे वैभव पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.