माणदेश एक्सप्रेस/कोलकाता: फिट होऊन वर्षभरानंतर संघात परतलेला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कसे पुनरागमन करतो यावर चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत. भारत-इंग्लंड यांच्यात धाव सामन्यांच्या टी-२० मालिकेला आज बुधवारी ऐतिहासिक ईडन गार्डनवर सुरुवात होत आहे. सायंकाळी ७ वाजेपासून हा सामना रंगणार आहे. भारताचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे झालेली जखम भरून काढणे हे असेल. टी-२० मालिकेनंतर उभय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकादेखील खेळणार असून १९ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीआधी आपली ताकद तपासून पाहण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होणार आहे.
२०२३च्या वनडे विश्वचषकात सुरुवातीला चार सामन्यांना मुकल्यानंतरही शमीने सर्वाधिक २४ बळी घेतले. वानखेडेवर न्यूझीलंडविरुद्ध त्याने ५७ धावांत ७ फलंदाज बाद केले. टी-२० मध्ये त्याचे केवळ २४ बळी आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनल खेळल्यानंतर घोट्याच्या दुखापतीमुळे शमी बाहेर होता. दरम्यान, त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठदुखीमुळे बाहेर असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शमीवर संघाची भिस्त असेल. शमीने अखेरचा टी-२० सामना २०२२ ला इंग्लंडविरुद्धच खेळला होता.
२००७ – पासून भारत-इंगलंड यांच्यात २४ टी-२० सामने झाले. भारताने १३ आणि इंग्लंडने ११ सामने जिंकले भारत-इंग्लंड यांच्यात २०१४ पर्यंत चार मालिका झाल्या. त्यात इंग्लंडने तीन मालिका जिंकल्या तर एक मालिका अनिर्णीत राहिली. २०१७ ते २०२१ या कालावधीत पुन्हा चार मालिका झाल्या. या चारही मालिका भारताने जिंकल्या. त्यातही दोनदा इंग्लंडला त्यांच्या मैदानावर पराभूत केले. दोन्हीं संघांनी भारतात ११ टी-२० सामने खेळले असून, भारताने सहा, तर इंग्लंडने ५ सामने जिंकले आहेत.