![suraj chavan](https://mandeshexpress.com/wp-content/uploads/2025/02/suraj-chavan.png)
‘बिग बॉस मराठीचा ५’ चा विजेता सूरज चव्हाण लवकरच मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर दिग्दर्शक केदार शिदेंनी सूरज चव्हाण प्रमुख भूमिका असलेला झापूक झुपूक सिनेमात दिसणार असे म्हटले होते. त्यानंतर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. आता स्वत:सूरज चव्हाणच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहायला मिळत आहे.
जिओ स्टुडिओ मराठीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपटातील लूक पाहायला मिळत असून, झापुक झुपूक हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार, हे जाहीर केले आहे. ही पोस्ट शेअर करताना जिओ स्टुडिओने सूरज चव्हाण व चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग केले आहे. सूरजच्या लूकबद्दल बोलायचे तर त्याने धोतर नेसले आहे, त्यावर कुर्ता घातला आहे. व त्यावर कोट घातल्याचे दिसत आहे. हातात अंगठ्या, मनगटावर घड्याळ, गळ्यात सोन्याची चैन, डोळ्यांवर गॉगल व चेहऱ्यावर मोठे हसू अशा लूकमध्ये सूरज चव्हाण दिसत आहे. त्याच्या शेजारी दोन डॉल्बी पाहायला मिळत आहेत. तसेच झापुक झुपूक असे ऐकायला येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जिओ स्टुडिओने, “करूया श्रीगणेशा, माघी गणपतीच्या मुहूर्तावर. बाप्पाच्या आशीर्वादाने येतोय. तुमच्यातलाच माणूस, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, २५ एप्रिल पासून, ‘झापुक झुपूक’”, असे लिहित झापुक झुपूक हा चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे.
‘झापूक झुपूक’विषयी बोलायचे तर या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे, तर निर्मिती ज्योती देशपांडे व बेला केदार शिंदे यांनी केली आहे. सूरज चव्हाणबरोबरच या चित्रपटात इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, जुई भागवत हे कलाकार दिसणार आहेत. सूरज चव्हाणच्या या पोस्टमध्ये या कलाकारांनादेखील टॅग केले आहे. यामध्ये लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनादेखील टॅग केले आहे. सूरज चव्हाणने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी चित्रपटाची वाट बघत असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी हार्ट इमोजी शेअऱ करीत प्रेम व्यक्त केले आहे.