
आपल्या शरीराचे बरेचसे वजन हे पाण्याचे असते. ज्यांना शोष पडतो, अशा स्थूल व्यक्तींनी जेवणाअगोदर पाणी प्यावे, त्यामुळे आहार कमी जातो, वजन वाढत नाही.
आपल्या सृष्टीत सर्वच जीवांकरता, वनस्पती विश्वासकट सर्वच प्राणिमात्रांकरता दैनंदिन जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रकारांनी पाण्याचे महत्त्व ‘आश्वासकराणां श्रेष्ठम्’ असे अत्यंत समर्पकपणे वर्णन केले आहे. आपणाला जगायचे असेल तर किमान तीन मूलभूत गरजा- हवा, पाणी व अन्न- आवश्यक असते. दैनंदिन जीवनात कोणतीही अडचण आली तर आपणास एखादा मार्गदर्शक, आपले वडीलधारे, जवळचे मित्र आपणास ‘तू भिऊ नकोस, आम्ही तुझ्याबरोबर आहोत,’ असे आश्वासन देतात. तसेच पाण्याचे महत्त्व घोटभर पाणी पी या सहज प्रेरणेने सगळ्यांनाच तत्क्षणी दिलासा देणारे आहे. एकवेळ अन्न नसले तरी चालते, पण तुम्हा-आम्हाला प्यायला पाणी हवेच.
शास्त्रकारांनी या द्रवद्रव्याचा फार बारकाईने विचार केला आहे. अष्टांगहृदयकार वाग्भटाचार्य सू.अ. ५ मध्ये ‘आकाशात पतितं तोयम्;’ आकाशात पडणाºया पाण्याचे, अंतरिक्ष जगाचे विस्ताराने वर्णन केले आहे. जगभर मानवी जीवनाला शुद्धच पाणी मिळावे म्हणून पाणी शुद्ध करण्याचे, शुद्धच पाणी पुरवठ्याचे २४ तास प्रयत्न चालू असतात.
शरद ऋतूमध्ये आकाश स्वच्छ असते. वातावरणात धूळ अजिबात नसते. या काळातील पावसाचे पाणी हे सर्वात शुद्ध जल होय. त्याला ‘अमृतजल’ अशी संज्ञा आहे. ज्यांच्या निवासात, गच्चीत किंवा उंच इमारतीत टेरेसवर मोकळी जागा आहे, त्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात मोठ्या भांड्यांना स्वच्छ फडके बांधून ठेवावे. पावसाचे पडणारे पाणी साठवावे. ते कधीही खराब होत नाही. त्यामध्ये किडे, जंतू अजिबात नसतात. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात हवेत खूपच धुळीचे कण असतात. त्यामुळे जून, जुलै या वर्षा ऋतूच्या काळात पडणाऱ्या पाण्याची व्यवस्थित शुद्धी करूनच ते वापरावे लागते. या पाण्याला आम्लविपाकी पाणी असे संबोधतात. जगभर आमांश, अॅदमिबायसिस, पोटदुखी, अतिसार या रोगांनी लोक हैराण असतात. आपल्या प्रजेला सुरक्षित पाणी मिळावे म्हणून सर्वच शासनयंत्रणा आपापल्या परीने प्रयत्न करत असतातच. पण आपल्या स्वास्थ्याकरिता जे पाणी प्यावयाचे ते उकळून गार करून प्यावे हे मी सांगावयास नकोच. पण अशा उकळलेल्या पाण्यात आपल्या अपेक्षेप्रमाणे थोडी सुंठ पूड मिसळून पाणी पिण्याकरिता वापरले तर ते सर्वात आरोग्यदायी पाणी असेल.
प्रत्येक जीवमात्राला मग तो मनुष्य असो, पशू-पक्षी, लहान जनावरे, मासे, कीटक, मुंग्या या सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात पाण्याची गरज असते. जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व असले तरी मनुष्यमात्राच्या हिताकरिता व्यक्तीनुरूप, कथानुरूप, कालानुरूप, व्यवसायानुरूप कमी-जास्त रोग लक्षणांप्रमाणे किंवा खाण्यापिण्याच्या पद्धतीनुसार पाण्याची मात्रा घेण्याची पद्धत, काल हे नेहमीच विचारात घ्यायला लागते. सर्वसामान्यपणे तहान लागली तरच पाणी प्यावे, हे तत्त्व सगळेच पाळतात. कडक उन्हाळा, ग्रीष्म ऋतू, शरद ऋतू, मे महिना किंवा ऑक्टोबर महिना या काळात ठरवून पाणी प्यावे. ज्यांना वजन वाढवायचे आहे, जे कृश आहेत त्यांनी जेवणानंतर थोड्या वेळाने जरूर पाणी प्यावे. कृश व्यक्तीने जेवणाअगोदर किंवा जेवणामध्ये पाणी पिऊ नये. ज्यांना खूप बोलण्याचा व्यवसाय आहे, डोकेदुखी, चक्कर, पित्त होणे या तक्रारी आहेत, त्यांनी रात्री दहा-पंधरा चांगल्या दर्जाच्या मनुका, बिया काढून भिजत टाकाव्यात.
सकाळी मनुका खाव्यात व वर ते पाणी प्यावे. कृश व हृदयरोगाच्या तक्रारी असणाऱ्यांनी या प्रकारेच दोन खजूर भिजत टाकून सकाळी त्याचे पाणी घ्यावे. त्यामुळे दुखण्याच्या तक्रारींकरिता इतर गोळ्या घ्याव्या लागत नाहीत. कॉलरा, जुलाब, उलट्या या विकारात, शरीरातील ओलावा कमी झाला असल्यास पाणी, गूळ किंवा साखरपाणी काही काळ घ्यावे. स्थूल व्यक्तींनी शक्यतो पाणी कमी प्यावे. आपल्या शरीराचे बरेचसे वजन हे पाण्याचे असते. ज्यांना शोष पडतो, अशा स्थूल व्यक्तींनी जेवणाअगोदर पाणी प्यावे, त्यामुळे आहार कमी जातो, वजन वाढत नाही.