सुप्रिया सुळेंनी भर लोकसभेत केले अमित शाह यांचे कौतुक; ठाकरे गटाचेही समर्थन

0
256

माणदेश एक्सप्रेस/नवी दिल्ली : बुधवारचा दिवस वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून चांगलाच गाजला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी केवळ यावर राजकीय मते व्यक्त केली नाही, तर सुधारणा विधेयकावर लोकसभेत विस्तृत चर्चा झाली. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आपापले म्हणणे मांडले. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत दीर्घ चर्चेनंतर मध्यरात्री मतदानाने पारित करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ एवढी मते पडली. एनडीएतील जेडीयू, टीडीपी, शिंदेसेना यांचे विधेयकाला समर्थन आहे. यानंतर मध्यरात्री २ वाजता मणिपूरबाबत एक प्रस्ताव लोकसभेत सादर करण्यात आला.

 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यरात्री २ वाजता मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीला अनुमोदन देण्याचा प्रस्ताव ठेवला. मध्यरात्री राष्ट्रपती राजवटीबाबत लोकसभेत चर्चा झाली. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यावर लोकसभेत एकमत झाले. राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही पाठिंबा दिला. या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्तुती करताना आपले म्हणणे लोकसभेत मांडले.

 

 

 

अमित शाह यांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, आम्हाला गृहमंत्र्यांकडून जास्त अपेक्षा आहेत. अमित शाह हे खंबीर गृहमंत्री आहे. अमित शाह यांच्यामुळे काश्मीरमध्ये खूप चांगले परिणाम पाहायला मिळत आहेत. असे असले तरी आमचे मणिपूरवर समाधान नाही. हे सरकार, एक देश एक निवडणुकीवर चर्चा करत आहे. पण राष्ट्रपती राजवट लावावी लागते, हे सशक्त लोकशाहीसाठी चांगले नाही. अमित शाह खंबीर आहेत, त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे की, मणिपूरमध्ये आपण शांतता प्रस्थापित कराल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान मोदी कधी तिथे गेले नाहीत. आम्ही मणिपूरला गेलो, तेव्हा गोगोई आमच्या सोबत होते. तेव्हा महिला राज्यपालांनी हतबलता प्रकट केली होती. परंतु, आम्ही राष्ट्रपती राजवटीचे समर्थन करतो, असे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here