बारामती : बारामती शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी(दि ७) जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. मागील काही काळापासून कांदा व दूध दर सातत्याने घसरत आहेत. कांद्याला हमीभाव व दुधाला रास्त दर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कांद्याला आणि दुधाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी खासदार सुळे, युगेंद्र पवार, तसेच पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह रस्त्यावर उतरल्या. बारामतीतल्या तीन हत्ती चौकात खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ठिय्या मांडला. हाताला काळ्याफिती बांधून त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. बळीराजाचे राज्य येऊ दे, जगाचा पोशिंदा जगला पाहिजे. शेतकरी बचाव, देश बचाव अशा विविध घोषणांनी आंदोलन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्यामुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून कांद्याचे दर सातत्याने खाली येत आहेत. दूध व्यवसायावर अनेक ग्रामीण तरुण सध्या अवलंबून आहेत. मात्र दुधाला कमी दर मिळत असल्याने ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती घटली आहे. परिणामी ग्रामीण भागातील अर्थचक्र थंडावले असून दुधाला रास्त दर मिळाला तर हे चक्र पुन्हा एकदा धावू लागेल. तसेच जिरायती व बागायती क्षेत्रामध्ये देखील शेतकरी कांदा लागवड करत असतात. कांदा भारतीय बाजारात पडून राहिल्यामुळे कांद्याचे दर कमालीचे घसरले असल्याचे सुळे यांनी नमुद केले.