
माणदेश एक्सप्रेस न्युज
मायणी : प्रतिनिधी “माणदेशातीलच नव्हे प्रत्येक दुर्गम खेड्यापाड्यात राहणाऱ्या माणसांचा जीवनसंघर्ष आपण माझ्या मातीचे संचित म्हणून पाहिले पाहिजे.हाच माझ्या रिपोर्ताज लेखनाचा केंद्रबिंदू राहिल्याने २०१३-१४ च्या दुष्काळात मी लिहिलेला ‘आगासवाडी’ हा रिपोर्ताज शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाला, याचा आनंद आहे.” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आनंद विंगकर यांनी केले. ते येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला’ उपक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे होते.
पुढे ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर आपल्या परिसरातील संघर्ष करणाऱ्या व जिद्दीने जगणाऱ्या माणसांच्या कहाण्या जाणून घ्यायला हव्यात. त्या वाचायला हव्यात. परिस्थितीशी टकरा देणाऱ्या या माणसांशी संवाद केल्यानंतर त्यांच्या जगण्याचे शहाणपण नक्कीच समजू शकते.
प्रारंभी मराठी विभाग प्रमुख डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी लेखक आनंद विंगकर यांच्या ‘दस्तावेज’ या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा ह. ना. आपटे राज्य वाङ्मय पुरस्कार (रुपये एक लाख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) जाहीर झाल्याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे म्हणाले, “खेड्यापाड्यातील मेंढपाळ लोक संध्याकाळी एकत्र जमल्यावर सुंबरान गातात. वृद्ध स्त्रिया ओव्या गातात. विद्यार्थ्यांनी त्या जरूर ऐकाव्यात. त्यातून एक सांस्कृतिक परंपरा स्पष्ट होते. कार्यक्रम संपल्यानंतर पाठ्यपुस्तकातील ‘आगासवाडी’ हा पाठ वाचून विद्यार्थ्यांनी लेखकासोबत त्या गावाला भेट दिली व ग्रामस्थांशी तसेच लेखकाशी संवाद साधला. यावेळी कादंबरीकार बाळासाहेब कांबळे, कवयित्री कुंदा लोखंडे, प्रा. श्रीकांत कांबळे, प्रा. स्वाती माळी, प्रा. दीपक काशीद, प्रा. सुनील साठे आदी मान्यवर उपस्थितहोते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजया कदम यांनी केले.कु. ऐश्वर्या गाढवे हिने आभार मानले.