‘…तर प्रकाश आंबेडकर यांना कायद्याचा अभ्यास करण्याची गरज आहे.’ प्रकाश आंबेडकरांवर संजय राऊतांचा घणाघात

0
152

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. यावरुन राजकारण तापलं आहे. आता या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही जर रामदास आठवले यांचा पक्ष खरा आहे, असं म्हटलं. तर त्यांना किती वेदना होतील”, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊतांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “आम्ही जर रामदास आठवले यांचा पक्ष खरा आहे, असं म्हटल. तर त्यांना किती वेदना होतील. आता आम्हाला काही वेदना होत नाहीत, अशाप्रकारची अनेक वक्तव्य येत असतात. प्रकाश आंबेडकर हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत. त्यांनी तो वैचारिक वारसा पुढे चालवायला हवा”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

प्रकाश आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करण्याची गरज
“एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे असं जर त्यांचं मत असेल तर प्रकाश आंबेडकर यांनी कायद्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यांनी कायदा आणि लोकभावना याचा अभ्यास करावा. रामदास आठवले यांचा पक्षही ताकदीचा आहे. अनेक पक्ष आहेत, जे पावसाळ्याच्या छत्रीप्रमाणे निर्माण होतात. कोणी तरी त्याला पाणी घालतं, तात्पुरत्या स्वरुपात आणि ते नष्ट होतात”, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले होते?
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सध्या आरक्षण बचाव यात्रा करत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहेत. रविवारी 4 ऑगस्ट रोजी एका सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

“उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला तर समजेल की एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट सरळसरळ डबल आहे. याचा अर्थ असा आहे की शिवसेनेची मतं एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आहेत. आता

शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो. उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा आरक्षणवादी आणि मुस्लीम यांच्यामुळे वाढला आहे,” असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here