“सर मी जया अमिताभ बच्चन..”; हे ऐकल्यानंतर सभागृहात एकच हशा, अध्यक्षांनाही हसू अनावर,एकदा व्हिडीओ पहाच

0
559

राज्यसभेत शुक्रवारी जेव्हा खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी त्यांचं नाव घेतलं, तेव्हा संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांनी ज्या गोष्टीवरून आक्षेप घेतला होता, तीच गोष्ट सभागृहात करून त्या स्वत:तर हसल्याच, शिवाय त्यांनी सर्व सदस्यांना हसवलं. राज्यसभेतील हे हलके-फुलके क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी त्यांचा उल्लेख ‘जया अमिताभ बच्चन’ असा केला होता. त्यावर जया यांनी आक्षेप घेत “केवळ जया बच्चन म्हटलं असतं तरी चाललं असतं”, असं म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी स्वत:हून ‘जया अमिताभ बच्चन’ असा उल्लेख केल्यानंतर सभागृहात गमतीशीर वातावरण निर्माण झालं होतं.

 

जया बच्चन यांनी त्यांचं नाव घेताच राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलखुलास प्रतिक्रिया व्यक्त केली. ते हसले आणि त्यांच्यापाठोपाठ सभागृहातील इतरही खासदार हसले. यात काँग्रेसचे जयराम रमेश आणि आम आदमी पार्टीचे (आप) राघव चड्ढा यांचाही समावेश होता. यानंतर त्यांच्यात काही मजेशीर संवादसुद्धा झाला. जया बच्चन त्यांना म्हणाल्या, “तुम्ही आज लंच ब्रेक घेतला का? नाही? म्हणूनच तुम्ही जयरामजींचं नाव सारखं घेताय. त्यांचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला जेवण पचत नाही.” त्यावर धनखडसुद्धा तितक्याच हलक्याफुलक्या पद्धतीने उत्तर देतात. “मी तुम्हाला हलक्या-फुलक्या नोटवर सांगतो की, मी आज लंच ब्रेक घेतला नाही. पण जयरामजींसोबत मी जेवलो”, असं ते म्हणतात. हे ऐकल्यानंतर सभागृहात पुन्हा एकच हशा पिकतो.

“मी तुम्हाला हेदेखील सांगू इच्छितो की मी तुमचा आणि अमिताभजींचा चाहता असण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल”, असंही धनखड पुढे म्हणतात. याआधी जेव्हा जया बच्चन यांचा उल्लेख ‘जया अमिताभ बच्चन’ असा करण्यात आला, तेव्हा त्यांनी त्यावरून नाराजी व्यक्त केली होती. “हे काहीतरी नवीन आहे की, स्त्रिया त्यांच्या पतीच्या नावाने ओळखल्या जातील. जसं की त्यांचं स्वत:चं अस्तित्व किंवा कर्तृत्वच नाही”, असं त्यांनी बोलून दाखवलं. जया बच्चन या चित्रपट आणि राजकीय अशा दोन्ही क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी 3 जून 1973 रोजी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केलं. या दोघांना श्वेता आणि अभिषेक ही दोन मुलं आहेत.

पहा व्हिडीओ: